बूट लपवले म्हणून नवऱ्या मुलाची शिवीगाळ, संतापलेल्या नवरीने लग्नच मोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर हिंदुस्थानात लग्नात नवऱ्या मुलाचे बूट लपवणं अर्थात जूता चुराई नावाची एक परंपरा चांगलीच लोकप्रिय आहे. पण, याच परंपरेमुळे भडकलेल्या एका तरुणाचं लग्न मोडलं आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे हा प्रकार घडला आहे.

मुजफ्फरनगरमध्ये भोराकला गावात गुरुवारी लग्न समारंभ सुरू होता. लग्नाचे विधी सुरू असताना वधुपक्षाकडील महिलांनी नवऱ्या मुलाचे बूट लपवले आणि त्याबदल्यात पैशांची मागणी केली. नवऱ्या मुलाला हा प्रकार अजिबात आवडला नाही. त्याचा संताप पाहून वधुपक्षाने त्याला समजवायचा प्रयत्न केला. यात काही महिलाही होत्या. पण, नवरा मुलगा शांत झाला नाही, उलट त्याने अश्लाघ्य शिव्या देत आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि वधुपक्षातील एका माणसाला मारहाणही केली.

हे पाहून नवऱ्या मुलीचा पारा चांगलाच चढला. तिने तत्काळ हे लग्न मोडल्याचं जाहीर केलं. संतापलेल्या वधुपक्षाने नवरा मुलगा, त्याचे वडील आणि दोन नातेवाईक यांना कोंडून घातलं आणि उरलेली वरात परत पाठवली. संतापलेल्या नवऱ्या मुलीकडे मिनतवाऱ्या करूनही ती बधली नाही. उलट तिने लग्नावेळी दिलेला 10 लाखांचा हुंडाही परत मागितला. हुंड्याची रक्कम परत देण्याच्या बोलीवरच वरातीला परत पाठवण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी मध्यस्थी केली असून कुणाहीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.