
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तान्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. सीमा सुरक्षा दलाने कोरी खाडी परिसरातून 15 पाकिस्तानी घुसखोरांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफच्या गस्ती पथकाला खाडी परिसरात संशयास्पद हालचाली सुरु असल्याची माहिती मिळाली. यादरम्यान, सैनिकांनी एक पाकिस्तानी बोट पकडली. बीएसएफला पाहताच बोटीवर उपस्थित असलेले काही लोक पळून गेले, परंतु सैनिकांनी 15 घुसखोरांना पकडले.
अटक केलेल्या घुसखोरांची चौकशी सुरू आहे. तसेच त्यांच्याकडे सापडलेल्या वस्तूंचीही तपासणी केली जात आहे, असे बीएसएफ अधिकाऱ्याने सांगितले. प्राथमिक माहितीनुसार हे लोक भारतीय सीमेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये अन्नपदार्थ, मोबाईल फोन आणि इतर साहित्य आढळले आहे. या घटनेनंतर, बीएसएफने परिसरात शोध मोहीम तीव्र केली आहे. खाडी परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. सैनिक आजूबाजूच्या भागातही गस्त घालत आहेत.