बोरिवलीच्या आरएमसी प्लांटचे काम तत्काळ बंद करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोरिवली येथील आरएमसी प्लांटकडून शासकीय नियमांचे उल्लंघन करण्यात आले असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ आहेत. त्यामुळे येत्या काळात येथील प्रदूषणामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने येथील प्लांटचे काम तातडीने बंद करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नुकतीच करण्यात आली. दरम्यान, या प्लांटच्या कामाची तपासणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रदूषण मंडळाकडून देण्यात आले आहे.

बोरिवली पश्चिम येथील लिंक रोडवरील सीटीएस क्र. 1490 वर ना-विकास क्षेत्रात, निवासी क्षेत्राच्या जवळ, शासकीय नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या प्रस्तावित आरएमसी प्लांट उभारण्यात आला आहे; परंतु या प्लांटकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सभोवतालच्या निवासी क्षेत्रात नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता 100 मीटर अंतरावर बफर झोन उभारण्यात आलेला नाही. त्याचबरोबर या प्लांटवर धूर हवेत न पसरण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्याची कोणतीही व्यवस्था आढळून येत नाही. त्याचबरोबर सभोवताली झाडे व भिंत उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे प्लांट सुरू झाल्यानंतर येथील नागरिकांना श्वसनविकार, खोकला, सर्दी इ. आजारांचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्यामुळे शिवसेनेने आक्रमक पवित्रा धारण करून या प्लांटचे काम तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण व विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांची भेट घेऊन निवेदन देत प्लांटचे काम बंद करण्याची मागणी केली आहे. यावेळी शिवसेना उपविभाग संघटक दीपा पाटील, विजय संघवी, शरद म्हात्रे, कमलेश सोढा उपस्थित होते.

प्लांटच्या कामाची तपासणी होणार

दरम्यान, शिवसेनेच्या मागणीची गंभीर दखल घेत या प्लांटच्या कामाची तपासणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांमार्फत करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या तपासणीत प्लांट चालकाने नियमांचा भंग केला असेल व त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असेल तर त्याच्यावर प्लांट बंद करणे अथवा अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत कठोर कारवाई करण्याची भूमिका अशोक शिनगारे यांनी व्यक्त केली आहे.