गोलंदाजांचा इम्पॅक्ट कमी होतोय; बुमराने व्यक्त केली खंत

jasprit-bumrah

टी-20 क्रिकेटमधील मर्यादित षटके आणि नवीन नियमांमुळे गोलंदाजांपुढे खऱया अर्थाने खूप मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नव्या नियमांमुळे गोलंदाजी करणे थोडे कठीण होत आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आणि वेळेचे असलेले बंधन यामुळे फलंदाजांना गोलंदाजांविरुद्ध अधिक आक्रमकपणे खेळण्याची सूट मिळत असून गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करणे शक्य होत नाही, अशी खंत हिंदुस्थानचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा याने व्यक्त केली. त्यामुळे इम्पॅक्ट प्लेअरचा फायदा गोलंदाजांपेक्षा फलंदाजांनाच अधिक होत असल्याचे समोर आलेय.

आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सामना सुरू असताना एखादा बदल करू शकतो. या नियमाचा वापर सुरू झाल्यापासून धावांचा पाऊस पडत आहे. तसेच गोलंदाजांना अनेक अडचणी येत असल्याने अनेक खेळाडूंनी यावर टीका केली आहे. हिंदुस्थानचा कर्णधार रोहित शर्मानेदेखील इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूचे महत्त्व कमी होत असल्याची खंत रोहितनेही बोलून दाखवली होती. गुरुवारी मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यानंतर बुमरानेदेखील या नव्या नियमांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

बुमरा म्हणाला, ‘नव्या नियमांमुळे टी-20 गोलंदाजांसाठी अधिक आव्हानात्मक झाला आहे. वेळेचे बंधन आणि इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमाचा फटका गोलंदाजांना बसत आहे. या नव्या नियमांमुळे गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करण्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे गोलंदाज हे त्यांच्या पूर्ण क्षमतेचे प्रदर्शन करण्यात असमर्थ ठरताहेत.’ इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमामुळे गोलंदाजांचे जगणे अजून कठीण झाले आहे.