
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
प्रेम कधी, कुणाला, कुणाशी, कसे होईल हे सांगता येत नाही. दिल्लीजवळील शाहपूर जाट गावातील एक तरुण तृतीयपंथीयाच्या प्रेमात पडला होता. तो त्याला रोज भेटण्यासाठी जात होता. त्याच्या वडिलांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी मुलासह तीन तृतीयपंथीयांना चोप दिला. या घटनेने संतप्त झालेल्या तृतीयपंथीयांनी जमावासमोरच कपडे उतरवून हंगामा सुरू केला. अखेर पोलिसांना बोलवण्यात आल्यानंतरही तृतीयपंथीय शातं झाले नाहीत. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यावर प्रकरण निवळले आहे. या प्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मारहाण झालेल्या तीन तृतीयपंथीयांची वैद्यकीय चाचणी करण्यात असून दोन्ही बाजूंना सामंजस्याने प्रकरण मिटवण्याच्या सूचना दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
शाहूपर जाट गावातील तरुणाला एका तृतीयपंथीयाशी प्रमे झाले. तो लपतछपत रोज त्याला भेटण्यासाठी जात होता. त्याच्या वडिलांना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी त्याला समज देत यापुढे तृतीयपंथीयाला भेटायचे नाही असे बजावले. तृतीयपंथीला भेटून आमची बदनामी का करतोस असा जाब विचारत त्याला घराबाहेर काढण्याची धमकीही वडिलांनी तरुणाला दिली. त्यानंतर त्या मुलाने तृतीयपंथीयाला भेटणे बंद केले. अनेक दिवस तरुण भेटत नसल्याने तृतीयपंथीय दोन सहकाऱ्यांसह त्याला भेटायला गावात आला. तो आल्याचे कळताच तरुणही त्याला भेटायला गेला. त्याच्या वडिलांना ही गोष्ट समजताच ते साथीदारांसह तेथे पोहचले आणि त्यांनी मुलासह तृतीयपंथीयांना चोपून काढले. या प्रकाराने संतप्त झालेल्या तृतीयपंथीयांनी जमावासमोर कपडे उतरवून हंगामा सुरू केला. सुमारे दोन तास तेथे गोंधळ सुरू होता. पोलीस आल्यावर त्यांनी मारहाण करणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन देऊन तृतीयपंथीयांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तृतीयपंथीयांनी केली आहे. एखादा तरुण आमच्या प्रेमात पडला तर आमची काय चूक असा सवालाही त्यांनी केला आहे.




























































