सुनेगांव ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार: प्रशासन अद्याप फिरकलेच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर तालुक्यातील सुनेगाव (शेंद्री) येथील ग्रामस्थांच्या वतीने बहिष्कार घालण्याचे निवेदन देऊनही प्रशासनने आजपर्यंत कुठलाही प्रतिसाद दिला नाही. एकीकडे मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी करोडो रुपये खर्च करणाऱ्या प्रशासनाला गेल्या १० दिवसांपासून रस्त्याच्या कामासाठी मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या सुनेगाव (शेंद्री) ग्रामस्थाच्या व्यथा ऐकून घ्यायला प्रशासनाला अद्यापही मुहुर्त सापडला नसल्याचे दिसून येत आहे.

सुनेगांव (शेंद्री) हे गांव लातूर लोकसभा मतदार संघामध्ये येत असून हे गाव नागरिकांच्या अनेक मुलभूत सुविधापासून वंचित आहे. या गावाहून तालुक्याला येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना ५ कि. मी.च्या अंतरासाठी १५ ते २० कि. मी. अंतराचा फेरा मारावा लागत असतो. ग्रामस्थांना शासकीय कामासाठी, दवाखाना, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तालुक्याला जावे लागत असते. रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थांनी एस.टी.महामंडळाची बसही पाहिली नाही.

प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार ग्रामस्थांना घ्यावा लागतो. देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे झाली तरीही या गावाला रस्ता नाही. रस्त्याच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करुन विविध प्रकारे अंदोलने करूनही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. सुनेगांव (शेंद्री) हे १६० उबऱ्यांचे गाव असून गावची लोकसंख्या एकूण १३०० एवढी आहे. २०१७ मध्ये पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर याच रस्त्यासाठी शेंद्रीच्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे प्रशासनाने त्यावेळी ग्रामस्थांच्या लोकसहभागातून तत्पुरता कच्चा रस्ता बनवून दिला. मात्र हा रस्ता पावसाळ्याच्या पहिल्याच पावसामध्ये वाहून गेला. त्यावेळी प्रशासनाने रडक्याचे डोळे पुसले मात्र त्यानंतर कसलीच हालचाल केली नाही. वेळोवेळी ग्रामस्थांनी रस्त्यासाठी पाठपुरावा करूनही काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामूळे लोकसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी मन्याड नदीवरील अर्धवट पुलावरून कसरत करावी लागत असते. या अर्धवट पुलाचे काम पूर्ण करावे. व पक्का रस्ता करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने तहसिलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना 25 मार्च रोजी निवेदन देण्यात आले मात्र आजपर्यंत यावर कोणतीही कार्यवही करण्याची तसदी प्रशासन तथा लोकप्रतिनिधींनी घेतलेली नाही त्यामुळे ग्रामस्थांनी राजकीय पुढाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना गावबंदी केली आहे.

रस्त्याचा प्रस्ताव प्रलंबित
आनंदवाडी ते शेंद्री सुनेगाव जोड रस्ता मग्रारोहयो मधून २०१७ मध्ये प्रस्ताव देण्यात आला असून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे मात्र अद्याप पर्यत जि. प. बांधकाम विभागाकडे हा प्रस्ताव धूळखात पडला असून प्रशासन या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत असल्याचे सरपंच नामदेव जायभाये यांनी सांगितले.

पाहणी करून लवरकच निर्णय
सूनेगांव (शेंद्री) ग्रामस्थांच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराचे निवेदन देण्यात आले असून रस्त्याचा प्रस्ताव व अंदाजपत्रक पाहून संबंधित विभागाशी चर्चा करून त्वरित निर्णय घेऊ, असे तहसीलदार अरूणा संगेवार यांनी सांगितले.

प्रशासनाचा आम्हाला वाईट अनुभव आहे. तात्पुरते काम करून ते वेळ निभावून नेतात. यावेळी न्याय न मिळाल्यास गावातील सर्वच रहिवाशी घर – शेती विकून स्थलांतर करू. प्रशासनाने याचा गांभिर्याने विचार करुन कायमस्वरूपी पक्का रस्ता न दिल्यास लातूर जिल्हा प्रशासन व शासनाच्या विरोधात वेळोवेळी असेच आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते गोविंद काळे यांनी सांगितले.