प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केले, प्रियकराने 8 मित्रांसह मिळून केला सामूहीक बलात्कार

मध्य प्रदेशातील इंदूरमधल्या द्वारकापुरी पोलीस ठाण्यात 23 वर्षांच्या महिलेने बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. 8 जणांनी आपल्यावर सामूहीक बलात्कार केल्याची या महिलेने तक्रार नोंदवली असून यातील मुख्य आरोपी हा तिचा एकेकाळचा प्रियकर आहे. 4 वर्षांपूर्वी या तरुणीचं तिच्या घरच्यांच्या मर्जीतील तरुणाशी लग्न झालं होतं. यामुळे तिचा प्रियकर संतापला होता आणि त्याने प्रेयसीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता.

पीडितेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 6 महिन्यांपूर्वी अंकीत कदम नावाच्या तरुणाने तिचे अपहरण केले होते आणि एका निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला होता. अंकीतसह त्याच्या साथीदारांनीही आपल्यावर बलात्कार केल्याचे या तरुणीने म्हटले आहे. जर याबद्दल कोणाला सांगितले तर तुझ्या बहिणीवरही बलात्कार करू अशी धमकी अंकीतने दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने उशिराने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

अंकीत कदम आणि पीडिता पूर्वी एकमेकांवर खूप प्रेम करायचे, मात्र या दोघांचे लग्न होऊ शकले नाही. पीडितेचे लग्न तिच्या घरच्यांनी दुसऱ्या एका तरुणाशी लावून दिले होते. पीडितेला एक अपत्य असून अंकीतने तिचा पाठलाग करणं सोडलं नव्हतं. अंकीत पीडितेवर भेटण्यासाठी सतत दबाव टाकत होता. पीडितेने त्याला सातत्याने नकार दिल्याने अंकीत संतापला होता. पीडिता कर्जासाठी काही दिवसांपूर्वी बँकेमध्ये जात असताना अंकीत आणि त्याच्या साथीदारांनी तिचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी मुख्य आरोपी अंकीत यालाही अटक केली आहे.