ब्रम्हास्त्र हिट की फ्लॉप? जाणून घ्या चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडीचा ब्रम्हास्त्र (Brahmastra) हा महत्वाकांक्षी चित्रपट हिट होणार का फ्लॉप याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आज शुक्रवारी म्हणजेच 9 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम चालवण्यात आली होती. ‘चित्रपटावर बहिष्कार घाला’ अशी मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. नेपोटीझम (घराणेशाही), वादग्रस्त विधाने यावरून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडीला वारंवार लक्ष्य करण्यात आले होते. यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणार का याकडे बॉलीवूडप्रेमींचे लक्ष लागले आहे. चित्रपट समीक्षकांनी चित्रपट पाहून त्यांची मते व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी koo app वर या चित्रपटाबाबत काय म्हटलंय ते पाहा

तरण आदर्श यांच्या मते हा चित्रपट निराश करणारा आहे. 5 स्टारपैकी आदर्श यांनी या चित्रपटाला 2 स्टार दिले आहेत. चित्रपटाबाबत त्यांनी koo app वर म्हटले आहे की, ‘चित्रपटाने घोर निराशा केली आहे. व्हीएफएक्स चांगले असले तरी कथानक कमजोर आहे. चित्रपटाचा उत्तरार्ध तर अधिकच निराश करणारा आहे. ब्रम्हास्त्र हा चित्रपट गेमचेंजर ठरला असता, मात्र या चित्रपटाने ही संधी गमावली आहे. चित्रपट चकचकीत आहे मात्र तितकाच पोकळ आहे.’

या चित्रपटाची घोषणा 2014 साली करण्यात आली होती. विविध कारणांमुळे हा चित्रपट पुढे ढकलला गेला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्या भूमिका असून शाहरूख खान हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. अशी तगडी स्टारकास्ट असतानाही समीक्षकांनी या चित्रपटाला निराश करणारा म्हणणे हे चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी चिंतेची बाब आहे. तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का ? तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा.