‘ब्रेल ज्ञानेश्वरी’चे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

अंधांनाही ज्ञानेश्वरी वाचता यावी. त्यांनाही त्यातील कथासाराचे ज्ञान व्हावे यासाठी ज्ञानेश्वरी ब्रेल लिपीत आणण्यात येत आहे. या ‘ब्रेल ज्ञानेश्वरी’चे शानदार प्रकाशन उद्या शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना भवन, दादर येथे सकाळी ११.३० वाजता  हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाला शिवसेना नेते- खासदार संजय राऊत, ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर उपस्थित राहणार आहेत. ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ घरोघरी पोहोचला, परंतु त्याच्या ज्ञानामृतापासून अंध बांधव वंचित राहिले. त्यांच्यापर्यंतही हे ज्ञान पोहोचावे यासाठी दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने ब्रेल लिपीत हा धर्मग्रंथ प्रकाशित करण्यात येत आहे. संत मुक्ताबाईने एका अभंगात म्हटले होते ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा.’ त्यानुसार खऱ्या अर्थाने या पुस्तकाच्या माध्यमातून आता अंध बांधवांसाठी ज्ञानाचे दरवाजे खुले करून देण्यात येत आहेत. या कार्यक्रमाला अधिकाधिक बंधूभगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी केले आहे.