
गेल्या दोन वर्षांत कोरोना नावाच्या महामारीने जगभरात थैमान घातलं. अनेकांचे जीव घेतल्यानंतर आता कुठे त्यावर नियंत्रण मिळवण्यात माणसाला यश येताना दिसत आहे. पण, कोरोना होऊन गेल्यानंतर अनेकांच्या शारीरिक समस्या वाढताना दिसत आहेत. त्यातील एक प्रमुख समस्या म्हणजे विस्मरण.
कोरोनाने संक्रमित झालेल्या अनेकांना विस्मरण होणं किंवा एकाग्रता नष्ट होण्यासारखे त्रास झाल्याच्या तक्रारी आहेत. वैद्यकीय भाषेत या स्थितीला ब्रेन फॉग म्हटलं जातं. ब्रेन फॉगमुळे माणसाच्या स्मरणशक्तीपासून ते निर्णयक्षमतेपर्यंतच्या विविध कृतींवर परिणाम होतो. या ब्रेन फॉगपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोक विविध उपाय आजमावून पाहत आहेत. कुणी डाएटच्या माध्यमातून तर कुणी व्यायाम करून यातून बरं होऊ पाहत आहेत.
पण, काही लोक असेही आहेत, जे स्वतःला विजेचा शॉक घेण्याचा उपाय करत आहेत. या उपचाराला अॅट होम ब्रेन स्टिम्युलेशन असं म्हणतात. म्हणजे घरच्या घरीच विजेचा शॉक घेणं. त्यामुळे मेंदू त्याच्या पूर्ण कार्यक्षमतेने काम करू लागतो. वास्तविक जेव्हा अशा प्रकारचे शॉक घेतले जातात, तेव्हा इलेक्ट्रोड्स थेट डोक्याशी जोडून मेंदूला हलका विजेचा धक्का दिला जातो. सुमारे 20 मिनिटांपर्यंत ही कृती केली जाते.
हा उपचार खूप जुना आहे. डिप्रेशनसारख्या आजारांवर अतिशय आरामदायी म्हणूनही या उपचाराकडे पहिलं जातं. आजाराच्या प्रकारावर याच्या वापराची क्षमता निर्धारित केली जाते. पार्किंसन्स सारख्या दुर्धर आजारात गंभीर स्थिती असेल तरीही हा उपचार केला जातो. पण हा उपचा घरी करून बघणं हे अत्यंत धोकादायक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. भलेही यासाठीचा किट ऑनलाईन तत्वावर उपलब्ध असेल, तरीही विजेचा शॉक लागण्यापासून ते मेंदू स्वयंचलितपणे काम करणं थांबवण्यापर्यंत याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.