
ब्राझीलच्या रिओ डी जनरियो येथे ड्रग माफियांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 119 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी झालेल्या या कारवाईनंतर ब्राझीलच्या जनतेमध्ये संताप पसरला असून अनेक निदर्शने करण्यात आली. याशिवाय, गव्हर्नरच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयानेही संपूर्ण घटनेचा अहवाल मागितला आहे.
रिओ डी जनरियोमध्ये पोलिसांच्या छाप्यादरम्यान झालेल्या चकमकीत हे मृत्यू झाले आहेत. रस्त्यावर मृतदेह ठेवून लोकांनी निदर्शने केली आणि पोलिसांवर विशिष्ट वर्गाच्या लोकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. या लोकांनी पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मोठ्या संख्येने लोक सरकारी मुख्यालयासमोर एकत्र जमले होते. त्यांनी घोषणा देत लाल रंगाचे ब्राझीलियन झेंडे लावले होते. मृतांची संख्या आणि मृतदेहांची अवस्था पाहून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने गव्हर्नर क्लॉडिओ कॅस्ट्रो यांना या कारवाईबाबत सविस्तर माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस कारवाईत एवढी लोकं कशी काय मारली गेली याबद्दल अनेकांना प्रश्न पडले आहेत. मृतांची एकूण संख्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आकड्यापैक्षा जास्त आहे.
रेड कमांड टोळीला लक्ष्य करून पोलिसांनी आणि सैनिकांनी हेलिकॉप्टर, चिलखती, वाहने आणि पायी चालत ही कारवाई केली. सध्या या घटनेवरून ब्राझीलमध्ये तणाव वाढला आहे आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.



























































