
साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. आपल्या परिसरात चुकून सुद्धा एखादा साप दिसला तरी त्याला पकडण्यासाठी धावपळ उडते. पण, जगात असंही एक बेट आहे, जिथे पावलापावलावर प्रचंड विषारी साप आढळतात.
या बेटाचं नाव आहे ‘इल्हा दा क्विमाडा ग्रांडे’. ब्राझील या निसर्गरम्य देशात हे बेट आहे. या बेटावर प्रत्येक चौरस मीटरमागे एक इतकी सापांची प्रचंड संख्या आहे. निसर्गाची किमया म्हणा किंवा चमत्कार या बेटावर जवळपास 2 ते 4 हजार महाविषारी साप आढळून येतात. गोल्डन लान्सहेड नावाने ओळखले जाणारे हे घोणस प्रजातीचे साप आहेत. या सापाचे विष खूप जहाल असतं आणि चावल्यास आजूबाजूची त्वचा आणि मांस जाळून टाकतं. एका तासाच्या आत माणसाचा मृत्यू ओढवतो.
सुमारे 10 हजार वर्षांपूर्वी हे साप ब्राझीलच्या मुख्य भूभागावर राहत होते. समुद्राची पातळी अचानक वाढल्यामुळे हे साप या बेटावर अडकले. बेट खूप लहान असल्यामुळे भक्ष्याची उपलब्धता खूपच कमी होती. ह्या नैसर्गिक समस्येवर मात करण्यासाठी सापांच्या शरीरामध्ये काही बदल घडून आले. ब्राझीलच्या मुख्य भूभागावर राहणाऱ्या इतर प्रजातीतील सापांपेक्षा यांचं विष 5 पटीने जास्त जहाल बनलं. तसेच वर्षाचा काही काळ ह्या बेटाला भेट देणाऱ्या विविध स्थलांतरित पक्ष्यांना त्यांनी भक्ष्य बनवायला सुरुवात केली आणि आता हाच त्यांचा अन्नाचा मुख्य स्रोत आहे. तसेच या सापांना आपले भक्ष्य बनविणारा कोणताही शिकारी प्राणी, पक्षी बेटावर नसल्यामुळे सापांची संख्या झपाट्याने वाढत गेली.
अलीकडच्या काळात ह्या सापांनी कोणाचा जीव घेतल्याची घटना नोंदवण्यात आली नाही. तरीही जेव्हा या बेटावर माणसं राहत होती तेव्हा मात्र अनेकांचे जीव या सर्पदंशाने गेले आहेत. तेव्हापासून हे बेट रिकामं करण्यात आलं. आता इथे सामान्य नागरिकांना जाण्याची परवानगी नाही. या बेटाची देखभाल करण्याची जबाबदारी ब्राझील या देशाच्या नौदलावर सोपवण्यात आली आहे.
बेटावर हजारो साप पसरण्यामध्ये समुद्री लुटारूंचा हात असावा असे काही जणांचे म्हणणे आहे. जुन्या काळी लुटलेला खजिना लपविण्यासाठी ते या बेटाचा वापर करत असावे आणि त्याच्या रक्षणासाठी सापांना इथे आणण्यात आले असावे. सध्या या बेटावर जाण्यासाठी ब्राझील सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. पर्यटकांना मज्जाव असणाऱ्या बेटावर फक्त संशोधकच पाऊल ठेवू शकतात. त्यांच्या बरोबर एक डॉक्टर असणं अनिवार्य आहे.
मागील काही काळामध्ये जागतिक हवामान बदल आणि तस्करी ह्यामुळे बेटावरील सापांची संख्या खूप कमी होऊ लागली आहे. सापांची तस्करी करणाऱ्या टोळ्या इथे सापळे लावून मोठ्या संख्येने साप पकडतात. काळ्या बाजारामध्ये एका गोल्डन लान्सहेड सापाला 10 ते 30 हजार डॉलर्स एवढी भरघोस किंमत मिळते. सापाच्या संवर्धनासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.



























































