
कोरोना झाला असतानाही चित्रीकरण करणे अभिनेत्री गौहर खानला चांगलेच महागात पडले आहे. तिच्या या निष्काळजीपणाची दखल फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज अर्थात एफडब्ल्यूआयसीईने घेतली असून गौहरला दोन महिन्यासाठी इंडस्ट्रीत बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओशिवरा येथे राहणाऱ्या गौहर खानची कोरोना चाचणी 11 मार्चला पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे तिने घरातच विलगीकरणात राहणे बंधनकारक होते. मात्र तसे न करता तिने सार्वजनिक ठिकाणी जाऊन चित्रीकरणात भाग घेतला होता. त्यानंतर क्वारंटाईनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तिच्याविरोधात के पश्चिम विभागातील आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. दरम्यान, या प्रकारावर गौहर खानच्या टिमने पत्रक जाहीर केले आहे. गौहर ही नियम आणि कायद्याला धरून चालणारी आहे. ती एक जबाबदार नागरिक आहे. त्यामुळे हे प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न करू नका. गौहर तिच्याकडून अपेक्षित असलेले सर्व सहकार्य मुंबई महापालिकेला करणार आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.


























































