
विविध कार्यकारी सोसायटीतील निलंबित करण्यात आलेल्या सचिवाला बडतर्फ करण्याचा आदेश काढण्यासाठी साडेतीन लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले आहे. नगर येथील महात्मा फुले चौकातील एका गाळ्यात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश गोविंद महांडुळे (मुळ रा. रुईखेल, ता. श्रीगोंदा, सध्या रा. सारसनगर, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील भैरवानाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवाविरुद्ध झालेल्या तक्रारीमुळे जिल्हा उपनिबंधकांनी त्याला निलंबित केले आहे. या सचिवाला निलंबनातून मुक्त करून पुन्हा सेवेत न घेता त्याला बडतर्फ करण्याचा आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेकडून काढून घेऊ, तेथे माझी ओळख आहे, असे आरोपी महेश याने तक्रारदाराला सांगितले होते. यासाठी चार लाख रुपये लागतील, असेही त्याने सांगितले होते. तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पडताळणीत चार लाखांची मागणी करून तडजोडीअंती साडेतीन लाखांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार नगर येथील महात्मा फुले चौकातील एका खासगी गाळ्यात महांडुळे याला साडेतीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हरीश खेडकर, सहायक सापळा अधिकारी शरद गोर्डे, हवालदार संतोष शिंदे, पोलीस नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल, अंमलदार वैभव पांढरे, रवींद्र निमसे, पोलीस नाईक राधा खेमनर, संध्या म्हस्के, चालक हरून शेख, राहुल डोळसे, नारायण न्याहळदे, सतीश भामरे यांनी ही कारवाई केली.



























































