
हेल्थ व इटिंग हाऊस परवाना नसल्याने बंद केलेले रेस्टॉरंट चालू ठेवण्यासाठी पुढील तीन महिन्यांकरिता 40 हजार रुपयांची मागणी करून त्यापैकी 30 हजार रुपयांची लाच घेताना पालिकेच्या आर/दक्षिण विभागाच्या स्वच्छता निरीक्षकाला अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
शंभू (नाव बदललेले) यांच्या मित्राचे रेस्टॉरंट असून त्यातील किचन रेस्टॉरंट हे गेल्या एक वर्षापासून शंभू हेच चालवत आहेत. दरम्यान 24 जून रोजी आर/दक्षिण विभागाच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सदर रेस्टॉरंटमध्ये जाऊन तपासणी केली असता शंभू यांच्याकडे हेल्थ व इटिंग परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे तेथील साहित्य ताब्यात घेऊन रेस्टॉरंट बंद करण्यास सांगितले. या कारवाईनंतर शंभू यांनी स्वच्छता निरीक्षक गणेश कदम यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली असता रेस्टॉरंट चालू ठेवण्याकरिता पुढील तीन महिन्यांसाठी 40 हजार द्यावे लागतील अशी मागणी केली. लाच द्यायची नसल्याने शंभू यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. त्यानुसार रचलेल्या सापळय़ात गणेश कदम यांना 30 हजार घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.