
शेतात विजेचे खांब बसविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणारा महावितरणचा सहायक अभियंता रायप्पा महादेवप्पा पाटील व त्याचा खासगी सहकारी चाँदसाब बाबू पठाण या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. ए. राणे यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व वीस हजार रुपये दंड ठोठावला.
अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथे असलेल्या राज्य विद्युत वितरण कंपनीत रायप्पा महादेवप्पा पाटील (रा. भवानी पेठ, सोलापूर) हे सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तडवळ गावातील शेतकरी संतोष गंगाधर कुंभार यांनी शेतातील वीज जोडण्यासाठी लागणारे पोल बसविण्यासंबंधी अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशीसाठी सहायक अभियंता रायप्पा पाटील यांच्याकडे आला होता. त्यांनी सदरच्या कामासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यात तडजोड होऊन 25 हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी कुंभार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. घटनेच्या दिवशी सहायक अभियंता रायप्पा पाटील व त्याच्या खासगी सहायक चाँदसाब बाबू पठाण (रा. पानमंगरुळ, ता. अक्कलकोट) यांनी इसारापोटी 5000 रुपये लाच घेतली. या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यात चार साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी व पुराव्यावरून न्यायालयाने रायप्पा पाटील व चाँदसाब पठाण यांना सक्तमजुरी सुनावली. सरकारतर्फे ऍड. माधुरी देशपांडे, तर आरोपीच्या वतीने ऍड. नीलेश जोशी यांनी काम पाहिले.





























































