
शेवगाव येथील तहसील कार्यालयातील फौजदारी सकलन शाखेतील महसूल कर्मचाऱ्याला चार हजार रुपये लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने रंगेहात पकडले .
संतोष सहदेव गर्जे (38) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबन माहिती अशी की तक्रारदार यांची दोन मुले व भाचा अशा तिघांना सबजेलमधून सोडविण्यासाठी मदत केल्याच्या मोबदल्यात तसेच तहसील कार्यालयात त्यांच्या विरुद्ध चॅप्टर केस मध्ये मदत करण्यासाठी येथील तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक संतोष गर्जे याने प्रत्येकी दोन हजार असे एकूण सहा हजार रुपयाची मागणी केली होती.
तहसील कार्यालयात पंचासमक्ष तडजोडी अंती चार हजार रुपयाची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक गर्जे याला नाशिक येथील लाच लुचपत पथकाने रंगेहात पकडले . लाचलुचपत पथकाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे -वालावलकर .अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी .पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक मीरा आदमाने यांच्यासह पोलीस नाईक प्रकाश महाजन, प्रवीण महाजन, चालक हवलदार संतोष गांगर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली. गेल्या वर्ष दीड वर्षात येथील तहसील कार्यालयात तीन महसूल सहाय्यक तसेच तलाठी कार्यालयातील मदतनीस असे विविध पाच कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे येथील तहसील कार्यालयाच्या कामकाजाबाबत जनतेतून प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या शेवगाव तहसील कार्यालयात प्रभारी कार्यभार असल्याने अधिकारी व कर्मचारी यांची कामकाजाबाबत मनमानी सुरू असल्याची जनतेतून चर्चा होत आहे .



























































