
हिंदुस्थान-चीनमध्ये लडाख सीमेवरून वाद आहे. पाच महिन्यांचा काळ उलटला तरीही हा तिढा सुटलेला नाही. उलटे दोन्ही देश सैन्य, हत्यारांची तैनाती करत एकमेकांना शह-काटशह देत आहेत. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग आमनेसामने येणार आहेत. निमित्त आहे 12 वे ब्रिक्स शिखर संमेलन.
कोरोना संकटकाळात 12 वे ब्रिक्स शिखर संमेलन व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आयोजित करण्यात आले आहे. 17 नोव्हेंबरला व्हर्चुअली आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात मोदी-झिनपिंग आमनेसामने असतील. सीमेवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे प्रमुख नेते समोरासमोर येणार असल्याने यास महत्व प्राप्त झाले आहे.
ब्रिक्स ही संघटना ब्राझील, रशिया, हिंदुस्थान, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांची आहे. यंदा कोरोना काळात हे संमेलन ऑनलाईन होणार आहे. यंदाच्या ब्रिक्स शिखर संमेलनाचा विषय ‘जागतिक स्थैर्य, सुरक्षा आणि विकासासात ब्रिक्स देशांचा सहभाग’ असा आहे.
वायुदल सज्ज
दरम्यान, चीन सीमेवर तणावाची स्थिती असल्याने हिंदुस्थानने वायुदल सज्ज ठेवले आहे. सीमेवर अत्याधुनिक राफेल, मिग-29, मिराज लढाऊ विमान, चिनुक हेलिकॉप्टर, अपाचे हेलिकॉप्टर, रुद्र हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आले आहे. चीनसोबत पाकिस्तानच्या आघाडीवरही युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास दोन्ही आघाड्यावर एकाच वेळी लढण्यास वायुदल सज्ज असल्याचे, वायुदल प्रमुख भदोरिया यांनी सांगितले.




























































