
>>ब्रिगेडियर हेमंत महाजन
पंजाबमधील मादक द्रव्यांचे ‘युद्ध’ एकाच वेळी दोन पातळ्यांवर लढणे आवश्यक आहे. एका बाजूला अमली पदार्थांची मागणी कमी करणे आणि दुसर्या बाजूला अमली पदार्थांची जी अवैध आयात-निर्यात होते तिला अटकाव करणे. यापैकी पहिला भाग संस्थांच्या सहकार्याने जनजागरण, व्यसनमुक्ती उपचार आणि व्यसनमुक्त झालेल्या मित्रांची फौज उभी करणे हा असावा. तर शासनामार्फत अमली पदार्थविरोधी संघटना स्थापन करणे, अमली पदार्थांच्या विक्रेत्यांना शोधून, दोषी व्यक्तींना जास्तीत जास्त सजा कशी होईल हे पाहणे ही दुसरी कारवाई असावी.
पंजाबमधील ड्रग माफियांचा विदारक चेहरा संपूर्ण देशासमोर आणला ‘उडता पंजाब’ या चित्रपटाने. यामुळे अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकलेली तरुणाई, गांजा, अफीम, चरस, ब्राऊन शुगर, मरिजुआना आदी अमली पदार्थांच्या सेवनामुळे तरुणाईवर होणारे परिणाम याची संपूर्ण देशभरात चर्चा झाली. स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या हरितक्रांतीमुळे पंजाब देशासाठी गव्हाचे कोठार बनला. मातीतून सोने पिकू लागले. या सोन्याने राज्यात समृद्धी आणि विनाशाच्या वाटा आणल्या. शेतीतून मिळणार्या बक्कळ पैशातून मौसमानंतर आठ महिने तरुण पिढी चैन करू लागली. संपत्तीचा ओघ पंजाबात येऊ लागला. पंजाबमध्ये टोलेजंग हवेल्या उभ्या राहिल्या. आलिशान गाड्यांची रस्त्यांवर रेलचेल दिसू लागली. मॉल व हॉटेल्स जागोजागी उघडली गेली. पब्ज व दारूच्या दुकानांनी मोठ्या प्रमाणावर आपले बस्तान बसविले. तेथे पैसा उधळला गेला, तरीही पंजाबी तरुणांच्या हाती बक्कळ पैसा बाकी राहिला. आता हा पैसा खर्च करायचा तरी कुठे? धूम्रपान, देशी व विलायती दारू, पब्ज, डिस्को, थेक्स या नशा विरंगुळ्याच्या बाबी ठरू लागल्या. देशातल्या देशात, सीमेवरून पंजाबमध्ये अफूचा चोरटा व्यापार सुरू झाला. बघता बघता ‘मादक’ द्रव्यांनी पंजाबच्या तरुण पिढीला घट्ट विळखा घातला.
त्याच वेळी स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानशी एकही युद्ध रणांगणावर जिंकू न शकलेला पाकिस्तान बांगलादेश निर्मितीची सल आजही उरात बाळगून आहे. हिंदुस्थानशी छुपे युद्ध पाकिस्तानने सुरू केले आहे. खलिस्तानची बंडखोरी हिंदुस्थानने कठोरपणे मोडून काढल्यावर पाकिस्तानने अफू हिंदुस्थानात पाठवण्यात सुरुवात केली. बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा अफूच्या गोळ्यांनी देशातील तरुणाईला संपविण्याची असुरी इच्छा बाळगणार्या पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील दहशतवादी संघटना, हिंदुस्थानात गुन्हेगारी कारवाया करून परदेशात आश्रय घेतलेले गुन्हेगार या व्यवहारातून हजारो कोटी रुपये कमवतात. याच पैशाचा वापर दहशतवादी व इतर गैर कारवायांसाठी केला जातो.
पंजाब-पाकिस्तान सीमेवरून अफूची तस्करी होते. सीमा सुरक्षा दलाकडून सोयीस्कर कानाडोळा केला जातो. पोलीस खात्याशी अफू माफियांचे साटेलोटे आहे. राजकीय संरक्षणाशिवाय हा बेकायदेशीर व्यापार होऊच शकत नाही. दुर्दैवाने आज पंजाबचे राजकीय नेते व त्यांचे जवळचे आप्तेष्ट आणि इतर उच्चपदस्थ या माफियागिरीत गुंतलेले आहेत. माध्यमांमध्ये आरडाओरडा झाला की पंजाब पोलीस कारवाईचा देखावा करतात. एखाद्या नशेखोराला पकडून त्याच्यावर अफूची वाहतूक व साठेबाजीची कलमे लावून तुरुंगात डांबतात. खटला दाखल करताना त्याला आश्वस्त करण्यात येते की, तू न्यायालयात सहज सुटशील, पण तोपर्यंत तुरुंगात राहावे लागेल, कारण मादक द्रव्यांची वाहतूक व साठेबाजीस जामिनाची तरतूद नाही. म्हणजे पोलीस यंत्रणाच गुन्हेगारांना जन्माला घालते.
नशेत वावरणार्या तरुणांना कुटुंबात ठेवणे कठीण जाते. त्यामुळे पंजाबमध्ये व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या वाढू लागली आहे. ही केंद्रे शुल्क घेऊन राबवली जातात. नशेच्या आहारी गेलेले तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे शुल्क परवडत नाही. कुटुंबातही थारा नाही आणि व्यसनमुक्ती केंद्र परवडत नाही अशा कात्रीत सापडलेली तरुणाई नकळतपणे गुन्हेगारीकडे वळते. नशेची चटक लागली की, कोणत्याही मार्गाने पैसा कमवायचा या मानसिकतेने त्यांना पछाडलेले असते.
देश व पिढी गिळंकृत करणार्या या देशविघातक विळख्यातून बाहेर पडणे अशक्य नाही. ८० च्या दशकात पंतप्रधानांपासून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आहुती पाडणार्या ‘खलिस्तान’ चळवळीचे पार कंबरडे मोडणार्या हिंदुस्थानला ‘मादक’ द्रव्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे शक्य आहे.
प्रामाणिक राजकीय इच्छाशक्ती हा या समस्येवरचा पहिला उपाय आहे. स्वच्छ चारित्र्याच्या राजसत्तेने दणका देताच हा व्यापार कोसळून पडेल. के.पी.एस. गिलसारख्या प्रामाणिक पोलीस अधिकार्याने प्रसंगी जाचक कायदे वाकवून खलिस्तान्यांचा नायनाट केला, त्याचप्रमाणे एखाद्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अनुभवी पोलीस अधिकार्याची नेमणूक करून त्यास मुक्तहस्ते काम करू दिल्यास सामान्य जनता ‘खबरी’ बनते. सामान्य नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. सामान्य हिंदुस्थानी नागरिक हा संकटसमयी आपली देशभक्ती न चुकता दाखवितोच दाखवितो. मादक द्रव्यांना राजाश्रय देणार्या गद्दार नेत्यांना धडा शिकवणे आवश्यक आहे. मादक द्रव्यांच्या दुष्परिणामांसोबत पाकिस्तानचा अंतस्थ हेतूही लोकशिक्षणाद्वारे जनतेच्या लक्षात आणून दिल्यास हा काळा व्यापार राजरोस करणे माफियांना अशक्य होईल.
पंजाबमधील हजारो कुटुंबांतील एकुलता एक मुलगा अथवा मुलगी, कर्ता मुलगा, विशीच्या आतली संतती, आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत मादक द्रव्यांच्या आहारी गेले व असहाय्यपणे त्यांनी त्यांचा विदारक मृत्यूही पाहिला. पंजाबची सर्वात महत्त्वाची ओळख आहे ती शौर्यासाठी, देशप्रेमासाठी. पण आता पंजाबी तरुण ड्रग्सच्या नशेतच आत्ममग्न होतोय. सामरिकदृष्ट्या पंजाब महत्त्वाचा आहे. प्रत्येक घरात एक सैनिक असणार्या पंजाबात आता प्रत्येक घरात किमान एक नशेची लागण झालेला सापडतोय.
पंजाबमधील मादक द्रव्यांचे ‘युद्ध’ एकाच वेळी दोन पातळ्यांवर लढणे आवश्यक आहे. एका बाजूला अमली पदार्थांची मागणी कमी करणे आणि दुसर्या बाजूला अमली पदार्थांची जी अवैध आयात-निर्यात होते तिला अटकाव करणे. या पैकी पहिला भाग संस्थांच्या सहकार्याने जनजागरण, व्यसनमुक्ती उपचार आणि व्यसनमुक्त झालेल्या मित्रांची फौज उभी करून व्यसनी व्यक्तींना मदत करणे हा असावा. तर शासनाच्या गृह, कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत अमली पदार्थ विरोधी संघटना स्थापन करणे, अमली पदार्थांच्या विक्रेत्यांना शोधून, दोषी व्यक्तींना जास्तीत जास्त सजा कशी होईल हे पाहणे ही दुसरी कारवाई असावी.
राज्यात तयार होणार्या आणि सीमेपलीकडून येणार्या अशा अमली पदार्थांची तस्करी हे पाकिस्तानने हिंदुस्थानविरुद्ध चालवलेले युद्धच आहे. देशाच्या सीमेपलीकडून मिळत असलेले प्रोत्साहन आणि देशांतर्गत गैरव्यवहार यांना आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य अशा दोघांनाही हातात हात घालून काम करणे अधिक गरजेचे आहे.


























































