
मुंबईमधील मंडळांनी गणेशोत्सवात राजकारण न करता समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. तसेच सुरक्षेसाठी मंडळांनी मंडपात सीसीटीव्ही लावावेत, असे आवाहन बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने मंडळांना केले आहे.
गणेशोत्सवात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करा. मंडप परिसरात डास निर्मूलन करण्यासाठी धूम्रफवारणी करावी. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता मदत कक्ष, हरवले-सापडे कक्ष, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी व्यवस्था करावी, असे आवाहन समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे. गणेशोत्सवानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे, मात्र गणेशोत्सवाला राजकारणापासून दूर ठेवून भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा करावा, असे आवाहनही समितीने केले आहे.