सहलीला गेलेले विद्यार्थी जेवण, पाण्यासाठी ताटकळले; मुंबई महापालिकेच्या शालेय सहलींच्या आयोजनावर पालकांचेच ताशेरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहल म्हटली की मुलांच्या आनंदाला उधाण येते, मात्र मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना सहलीचा वाईट अनुभव आला आहे. बुधवारी चौथीच्या विद्यार्थ्यांची सहल बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेली होती, मात्र पाण्यासह इतर खाऊच्या वस्तू वेळेत न मिळाल्याने विद्यार्थी भरउन्हात तहान आणि भुकेने व्याकूळ झाले. या सहलींच्या आयोजनासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च केले जात असून सहलींचे पंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका सहलीची गंमत अनुभवायला आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना बसला आहे. पालकांनीही सहलीच्या आयोजनावर ताशेरे ओढले असून या युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी सिनेट सदस्यांनी याप्रकरणी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.

मुंबई महानगरपालिका शाळांमधील चौथी आणि सातवीतील जवळपास 3 हजार 200 विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त नेतृत्व गुण, वैज्ञानिक दृष्टिकोन प्रासंगिक नोंदी आदींचे विकसन होण्यासाठी महापालिका शिक्षण विभागाद्वारे ‘शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. बुधवारी एच पूर्व व एच पश्चिम विभागातील शाळांमधील मुलांची सहल गेली होती. या सहलीबाबत काही पालकांकडून तक्रारी आल्या असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यार्थ्यांचे पिण्याचे पाणी, खाणे यांचे अतोनात हाल झाले आहेत, असे युवासेनेने शिक्षणमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या सहल प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी युवासेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेना पक्ष सत्तेत असताना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार प्रामुख्याने शालेय शिक्षण विभागाचा कारभार होत असे. त्यामुळे सर्व प्रक्रिया, विद्यार्थ्यांना मिळणाऱया सुविधा याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष होते, परंतु या वर्षी अवघ्या पाच दिवसांत सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या संपूर्ण आयोजन प्रक्रियेत संशय निर्माण होत आहे. सहलीचे आयोजन करण्याकरिता देण्यात आलेले कॉन्ट्रक्ट सर्व प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आले आहे का, असा सवाल युवासेनेने उपस्थित केला आहे. ही सहल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत संपणे अपेक्षित असताना केवळ दोन ठिकाणे दाखवून दुपारी दोनच्या आतच ही सहल संपवण्यात आली. तसेच काल विद्यार्थ्यांना सहल संपेपर्यंत पाणी मिळालेच नाही. सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांचा विमा काढण्यात आला आहे का, हादेखील एक प्रश्नच आहे असे प्रदीप सावंत यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सातवीचे विद्यार्थी 34 हजार 062

  • प्रति विद्यार्थी खर्च 600 रुपये
  • एकूण खर्च 3 कोटी 97 लाख 52 हजार रुपये
    (सातवीची सहल घाटकोपर किडझानिया येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रति विद्यार्थी खर्चामध्ये प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, मिनरल वॉटर, विद्यार्थ्यांकरिता अपघात विमा संरक्षण आदींचा समावेश आहे.)

असा आहे सहलीचा खर्च

  • सहलीला जाणारे चौथीचे विद्यार्थी 34 हजार 267
  • प्रति विद्यार्थी खर्च 564 रुपये
  • एकूण खर्च 1 कोटी 93 लाख 15 हजार रुपये