
कोरोना आटोक्यात येत असतानाच ब्रिटनमधील नवीन कोरोनाने महाराष्ट्रात शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे आठ रुग्ण आढळून आल्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. मुंबईत पाच, ठाणे, पुणे, मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला असून या सर्वांना विलगीकरणात (क्वॉरंटाइन) ठेवण्यात आले आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आरोग्य यंत्रणांकडून युद्धपातळीवर घेण्यात येत असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाची तातडीने बैठक बोलावत अधिक दक्षता घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त तसेच आरोग्य यंत्रणांना दिले.
देशात नवीन कोरोनाचे अद्यापपर्यंत 38 रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यातही आतापर्यंत 4836 प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे. यातील 72 प्रवासी हे पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील मुंबईत 30, पुणे 14, ठाणे 8, नागपूर 9, नाशिक, संभाजीनगर, रायगड आणि लढाण्यात प्रत्येकी 2 तर धाराशीव, नांदेड आणि वाशिममध्ये प्रत्येकी 1 प्रवासी आढळून आला होता. यातील 68 जणांचे जिनोमिक सिक्वेन्सिंग करण्यात आले हाते. त्यातील 8 प्रवाशांच्या चाचण्यांच्या नमुन्यांत नवीन कोरोना विषाणू आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान दिली.
ते आठ प्रवासी 25 नोव्हेंबर ते 21डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात आले – आरोग्यमंत्री राजेश टोपे
25 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर या काळात ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आले. यात 43 स्वॅब पॉझिटिव्ह आढळले होते. हे स्वॅब एनआयव्हीकडे पाठविण्यात आले. जिनोमिक सिक्वेन्सिंग करण्यात आल्यानंतर या 43 पैकी 8 प्रवासी ब्रिटनच्या व्हायरसच्या स्ट्रेनचे आढळले. या रुग्णांसाठी वेगळ्या पद्धतीने आयसीएमआरने दिलेले प्रोटोकॉल पाळावा लागतील. जे असम्टमॅटिक आहेत त्यांना 14 दिवस तर ज्यांना अन्य आजार आहेत त्यांना 21 दिवस क्वॉरंटाइन करण्यात येईल. घाबरण्याची गरज नाही या नवीन व्हायरसचा संसर्ग वेगाने होत असला तरी आपण आपली काळजी घेतली, कोरोना टाळण्यासाठीचे नियम पाळले तर आपण सुरक्षित राहू, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पॉझिटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आल्याने 30 जण पॉझिटिव्ह
परदेशातून आलेल्या प्रवाशांपैकी 3390 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यातील 72 पॉझिटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या 293 जणांचा शोध घेण्यात आला यातील 30 जण हे पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.






























































