
तुम्ही आमच्या कोरोना प्रतिबंधक लसीला मान्यता देणार नसाल तर तुमच्या देशातून येणाऱ्या लसींनाही आम्ही तोच नियम लावू, असा इशारा हिंदुस्थानने ब्रिटनला दिला होता. त्यानंतर ब्रिटनने कोव्हिशिल्ड लसीला मंजुरी दिली. पण हिंदुस्थानातील लसीकरण प्रमाणपत्राला मान्यता देण्यास मात्र नकार दिला आहे. ब्रिटिश प्रशासनाच्या या आडमुठय़ा धोरणामुळे आता हिंदुस्थानातून ब्रिटनला जाणाऱ्या नागरिकांना 10 दिवस विलगीकरण (क्वारंटाईन) सक्तीचेच ठेवण्यात आले आहे.
हिंदुस्थान, आफ्रिका, दक्षिण अमेरिका व इतर काही देशांतून लस घेऊन आलेल्यांच्या लसीकरणास मान्यता न देण्याचा निर्णय ब्रिटन सरकारने घेतला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठय़ा प्रमाणात दबाव निर्माण झाल्यानंतर ब्रिटनने आपल्या निर्बंधांमध्ये काहीसे बदल केलेत. ब्रिटनने अखेर सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने बनवलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या कोरोना लसीला त्याच्या नवीन प्रवासाच्या नियमावलीत मंजुरी दिली आहे. मात्र ब्रिटनला जाणाऱ्या हिंदुस्थानींना अजूनही विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे.




























































