ब्रिटनमधील यॉर्क विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे मुंबईत कॅम्पस

ब्रिटनमधील प्रतिष्ठत यॉर्क विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे मुंबईत कॅम्पस सुरू होणार असून यात विविध व्यावसायिक, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू चार्ली जेफरी यांनी मुंबईत सुरू असलेल्या वेव्हज शिखर परिषदेदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी औपचारिक सामंजस्य करार (एमओयू) केला. यामुळे नवीन कॅम्पसचा मार्ग मोकळा झाला आहे.

या करारानुसार 2026 मध्ये विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचला प्रवेश दिला जाईल. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियामक मंजुरीच्या अधीन राहून हे प्रवेश केले जातील. याअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा, बिझनेस, अर्थशास्त्र आणि संगणक विज्ञानात पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातील.

याशिवाय युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यासोबतही करार करण्यात आला आहे. दोन्ही विद्यापीठांशी प्रत्येकी 1500 कोटी रुपयांचा करार करण्यात आला.

नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यू सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.