चालकाचे नियंत्रण सुटले, कार दुभाजकाला धडकली; भीषण अपघात महिला आमदार ठार

तेलंगणातील भारत राष्ट्रीय समितीच्या (BRS) आमदार लस्या नंदिता (37) यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. हैदराबादमधील नेहरू आऊटर रिंग रोडवर त्यांच्या कारला अपघात झाला. लस्या नंदिता यांच्या चालकाचे कारवरचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाचकाला जाऊन धडकली. यातच लस्या नंदिता यांचा मृत्यू झाला, तर कारचालक गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी संगारेड्डीचे पोलीस अधिक्षक सीएच रुपेश यांनी सांगितले की, नंदिता या बसारा येथून गच्चिबावलीकडे प्रवास करत होत्या. वाहन चालवत असताना चालकाला डुलकी लागली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, वाहनाच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. तसेच या अपघातात आमदार नंदिता यांचा खासगी सुरक्षा रक्षकही गंभीर जखमी झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

तेलंगणाते मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. रेवंत रेड्डी म्हणाले, नंदिता यांच्या अपघाती मृत्यूमुळे मला धक्का बसला आहे. त्यांचे वडील जी सयान्ना यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध होते. मागच्या वर्षी याच महिन्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच महिन्यात एका वर्षाच्या अंतराने नंदिता यांचाही मृत्यू व्हावा, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

आमदार लस्या नंदिता या पाचवेळा आमदार राहिलेले जी सायन्ना यांच्या कन्या होत्या. आमदार जी सयान्ना यांनी सिकंदराबाद कॅन्ट मतदारसंघातून पाचवेळा आमदारकी मिळवली होती. परंतु फेब्रुवारी, 2023 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएसने सिकंदराबादमधून लस्या नंदिता यांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा 17 हजार मतांनी पराभव करत नंदिता विजयी झाल्या होत्या.