मठात गांजा ओढण्यास नकार दिल्यामुळे साधूवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मंदिरवजा मठात गांजा ओढण्यास विरोध केल्याचा राग मनात धरून गर्दुल्यांनी साधूंवर सशस्त्र हल्ला केला. यामध्ये साधू गंभीर जखमी झाले आहेत. गर्दुल्यांच्या टोळक्याने महंतावर हल्ला केल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे. जखमी महंतास उपचारांसाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राम कृपाळू दास महाराज असे जखमी महंतांचे नाव आहे. सोलापूर एसटी स्थानकापासून जवळच असलेल्या मुरारजी पेठेत निराळेवस्ती रस्त्यावर राज राजेश्वरी हनुमान मंदिर आहे. या मंदिरात साधूंचा मठ असून, तेथे देशाच्या विविध भागांतून आलेले साधू, महंत वास्तव्य करतात. आजूबाजूला असलेले समाजकंटकांचे टोळके किंवा गर्दुले गांजा ओढण्यासाठी मठात घुसखोरी करतात. साधू, महंत आणि भाविकांचा विरोध झुगारून गांजा ओढण्याचा कार्यक्रम सुरू असतो. नशेत असलेले गर्दुले हे साधू-महंतांच्या अंगावर धावून जातात. मात्र, समाजकंटक असलेल्या गर्दुल्यांनी क्रूरतेचा कळस गाठला. गांजा ओढण्यास विरोध करणारे महंत राम कृपाळू दास महाराजांवर सशस्त्र हल्ला केला. महंत रामकृपाळ दास यांच्या गळा आणि हनुवटीवर वार करण्यात आले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, इतर साधूंनी तत्काळ धाव घेत हल्लेखोरांच्या तावडीतून महंतांची सुटका केली.

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हल्ल्याची घटना

निराळेवस्ती परिसरात राज राजेश्वरी मंदिराशेजारी होत असलेल्या त्रासाबाबत अनेकदा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मठात येऊन समाजकंटक गांजा ओढतात, साधू-संतांना आणि महंतांना त्रास देतात, अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. सोलापूर शहर पोलिसांनी याची वेळीच दखल घेतली असती, तर आज ही वेळ आली नसती, अशी खंत मठातील साधूंनी शासकीय रुग्णालयात व्यक्त केली. समाजकंटकांवर कारवाई झाली नाही, तर मोर्चे काढू, धरणे आंदोलने करू, असा इशारा साधू-संतांनी दिला आहे.