
सामना प्रतिनिधी । मुंबई
अर्थसंकल्प जाहीर करण्यापूर्वीच त्यातील तरतुदी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटरवरून जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करत आणि हा सभागृहाचा अपमान असल्याचे सांगत मंगळवारी विरोधकांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर होत असतानाच प्रचंड गरादोळ केला. विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले. मात्र विधान परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे अर्थसंकल्प थांबवला गेला. सभापतींनी अशा प्रकारे कामकाज थांबवायला नको होते असे सांगत सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सभापतींविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणणार असल्याचे सांगितले. अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला.
सभापती काय म्हणाले…
मी स्वतःदेखील यापूर्वी ट्विटरवरून अर्थसंकल्प फुटल्याचे ऐकलेले नाही. त्यामुळे ही नेमकी काय भानगड आहे, यातली तांत्रिक बाब काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मी 10 मिनिटे घेतली. त्यासाठी सर्व गटनेत्यांना माझ्या दालनात बोलावले, असे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. सभागृह नेत्यांनी अविश्वास ठराव आणणार असल्याचे सांगितल्यानंतर आणि प्रचंड संताप व्यक्त केल्यानंतर विरोधकांचा गदारोळ तसाच सुरू राहिला. त्यानंतर सभापतींनी आपली बाजू सभागृहात मांडली.
नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यावे
अर्थसंकल्प अजिबात फुटलेला नाही. नवीन तंत्रज्ञान आले आहे. अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना सहाजिकच 2 वाजून 16 मिनिटांनी अर्थसंकल्पातील तरतुदी ट्विटरवरून जाहीर झाल्या. त्यानंतर दर 16 मिनिटांनी तरतुदी ट्विट केल्या गेल्या. केंद्रीय बजेट सादर केले गेले तेव्हा दर चार मिनिटांनी सोशल मीडियावरून त्यातील मुद्दे प्रसारित होत होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे दर अडीच मिनिटांनी प्रसारित होतात. आम्ही तर दर 16 मिनिटांनी ट्विटरवरून तरतुदी जाहीर केल्या. त्यामुळे विरोधकांनी हे नवीन तंत्रज्ञान शिकून घेण्याची गरज आहे. माझ्याकडे सध्या शिक्षण खाते नाही. पण ज्यांना हे तंत्रज्ञान शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी शिक्षण मंत्री आशीष शेलार यांना सांगून तशी सुविधा उपलब्ध करून देऊ, असा टोला संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी लगावला.
धनगर आरक्षणावरून विरोधकांचा सभात्याग
अर्थसंकल्प सादर करत असताना धनगर आरक्षणाचा मुद्दा आला. धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा अचलून आपला आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न केला. परंतु झाला तेवढा गोंधळ पुरे झाला. तुम्ही खाली बसा, अशी सूचना सभापतींनी केल्यानंतर विरोधकांनी पुन्हा गदारोळ करण्यास सुरुवात केली. मात्र सभापतींनी अर्थसंकल्प पुढे सादर करण्यास सांगितल्याने विरोधकांनी अखेर सभात्याग केला.
सभागृह नेत्यांकडून अविश्वासाचा ठराव
अर्थसंकल्प सभागृहात सादर होत असतानाच विरोधकांनी अशा प्रकारे गोंधळ घालणे आणि तो थांबवला जाणे हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले. सभापतींनी अशा प्रकारे सभागृहाचे कामकाज थांबवायला नको होते, असे सांगत सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. तसेच सभापतींची प्रतिमा जशी सभागृहात आहे तशीच बाहेरही आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला न्याय द्याल, असा विश्वास आता आम्हाला राहिलेला नाही, असे सांगत सभापतींविरोधात अविश्वासाचा ठराव आणणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावर सभापतींविरोधात तसा अविश्वासदर्शक ठराव आणता येणार नाही, असे सांगत सभापतींनी अर्थसंकल्प पुढे सादर करण्यास सांगितले.
अर्थसंकल्प फुटलेला नाही
अर्थसंकल्प ट्विटरवरून फुटल्यावरून विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साफ इन्कार केला. वित्त मंत्र्यांच्या अर्थसंकल्पाच्या भाषणापूर्वी त्याबाबत एकही ट्विट झाले नाही. दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी पहिले ट्विट झाले असून अर्थसंकल्प फुटलेला नाही, असे स्पष्ट करतानाच काळाप्रमाणे डिजिटलचे नवे तंत्रज्ञान विरोधकांनी समजून घ्यावे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लागावला.
सध्याचे युग डिजिटल माध्यमांचे आहे. ही माध्यमे धावत्या समालोचनासारखे अपडेट देत असतात. ‘‘डिजिटल मीडियादेखील अर्थसंकल्पाची दखल घेत असतात. विरोधी पक्षांनी ही माध्यमे समजून घ्यावीत. आमच्यावर टीका करण्यासाठी विरोधक ट्विटरचा वापर करतात; पण आम्ही सकारात्मक वापर करत आहेत. यामुळे त्यांनी आक्षेप घेऊ नये,’’ असे सुनावताच विरोधकांनी पुन्हा सभागृहात यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.
– सुधीर मुनगंटीवार धनगर तसेच ओबीसी समाजाविषयीच्या योजना सांगत असतानाच विरोधकांनी अर्थसंकल्प फुटल्याची बोंब केली. यावर संतापलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी ओबीसींच्या मागण्यांवर गोंधळ घालता. ही जनता तुम्हाला पुढच्या अर्थसंकल्पात सभागृहात येऊ देणार नाही, असा टोला लगावला.

























































