फ्लॅट देण्यास दिरंगाई करणाऱ्या विकासकाला दणका, घरासह २० लाख रुपये देण्याचे आदेश

547

फ्लॅटचे पूर्ण पैसे भरूनही दिलेल्या मुदतीत घराचा ताबा देण्यास दिरंगाई करणाऱ्या पुण्यातील एका विकासकाला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चांगलाच दणका दिला. बाल्कनी, टेरेस फ्लॅटसह सात वर्षांचे व्याज म्हणून 20 लाख रुपये देण्याचे आदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बिल्डरला दिले आहेत. ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या या आदेशामुळे ग्राहकाला दिलासा मिळाला आहे.

राकेश राठी यांनी 2007 साली पुण्यातील हवेली येथे 2000 स्के. फूट फ्लॅटचे बुकिंग केले होते. त्यासाठी त्यांनी विकासकाला फ्लॅटची संपूर्ण किंमत 35.10 लाख रुपये दिले. काही कारणास्तव हा प्रकल्प दुसऱ्या विकासकाने विकत घेतला. संबधित विकासकाने राठी यांना 1700 स्के. फूटांचा फ्लॅट देऊ केला तसेच फ्लॅटची किंमतही वाढवली व 2012 साली फ्लॅटचा ताबा देण्यात येणार असल्याचे विकासकाने सांगितले; परंतु 2012 सालीही त्यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. त्यानंतर विकासकाने बुकिंग रद्द करण्याचे राठी यांना सुचवले; परंतु अटी मान्य नसल्याने याविरोधात राठी यांनी अॅड. अगस्ती विभुते यांच्यामार्फत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली.

मानसिक त्रासापोटी आणखी 1 लाख रुपये

ग्राहकाने मुदतीपूर्वीच पूर्ण पैसे भरूनही त्याला फ्लॅटचा ताबा विकासकाने न दिल्याचे लक्षात येताच न्यायाधीश डी. आर. शिरसावो आणि ए. के. झाडे यांनी विकासकाला दोन महिन्यांत बाल्कनी टेरेससह घराचा ताबा देण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर, 31 डिसेंबर 2012 पासून ते आतापर्यंतचे 9 टक्के दराने घराच्या किंमतीवर 20 लाख रुपये इतके व्याज आणि मानसिक त्रासापोटी 1 लाख रुपये देण्यास बजावले.

आपली प्रतिक्रिया द्या