बुलढाण्यातील बस अपघात चालक मद्यधुंद असल्यामुळे! रक्ताच्या नमुन्यात आढळले 30 टक्क्यांहून अधिक अल्कोहोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र बसचालकाच्या रक्तनमुन्यात 30 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोल आढळले आहे. त्यामुळे या दुर्घटनेस मद्यधुंद चालकच जबाबदार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.

1 जुलैच्या पहाटे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात पिंपळखुटा गावाजवळ पुण्याकडे निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सची बस खांबाला धडकून दुभाजकावर उलटली. बसची डिझेल टाकी फुटल्याने क्षणार्धात बस जळून भस्मसात झाली आणि 25 प्रवाशांचा कोळसा झाला. या अपघातातून आठ जण बचावले होते. बसचा चालक शेख दानिश याने टायर फुटल्याने बस भेलकांडल्याचे पोलिसांना सांगितले होते. अपघाताच्या काही तासांतच फोरेन्सिक पथकाने दानिशच्या रक्ताचे नमुने घेतले होते.

त्याचा अहवाल आला असून त्यात 30 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोल आढळले आहे. रक्ताचे नमुने घेण्यास उशीर झाला होता. त्यामुळे अल्कोहोलची तीव्रता कमी झाली असावी. त्यामुळे दुर्घटना घडली तेव्हा अल्कोहोलचे प्रमाण नक्कीच प्रचंड असावे, अशी शक्यता अमरावतीच्या फोरेन्सिक प्रयोगशाळेने व्यक्त केली आहे. प्रयोगशाळेने 25 पैकी 23 मृतदेहांची डीएनए चाचणी पूर्ण केली असून दोन मृतदेहांचा अहवाल अद्याप आलेला नाही, असे प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ. विजय ठाकरे यांनी सांगितले.

टायर फुटले की नाही?
बसचा चालक शेख दानिश याने टायर फुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले होते. त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने या अनुषंगाने तपास केला. टायरच्या खुणा आणि नमुनेही तपासण्यात आले, पण रस्त्यावर टायर फुटल्याच्या खुणा आढळल्या नाहीत.