बुलढाणा जिल्ह्यात पाच कोरोना रूग्णांना घरी सोडले; टाळ्या वाजवून स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलडाणा असलेल्या 21 कोरोनाबाधीत रूग्णांपैकी एकाचा मृत्यू झाल्यानंतर 20 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी 17 एप्रिल रोजी तीन कोरोनाबाधीत रूग्णांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर 17 रूग्ण रूग्णालयात उपचार घेत होते. त्यापैकी सोमवारी चार रूग्णांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला. तसेच एका आधीच्या कोरोनाबाधीताचा दुसरा अहवाल पॉझीटिव्ह आला होता. त्यानंतर सोमवारी त्या व्यक्तीचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे रूग्णालयातून सोमवारी पाच रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात या पाच रूग्णांसह डिस्जार्ज देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 8 झाली आहे. सध्या रूग्णालयात 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे सोमवारी पाचही रूग्णांचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून 14 व 15 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने चिखली, चितोडा, दे.राजा व शेगांव येथील रूग्णाला 17 दिवसानंतर डिस्जार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारात बरे झाल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर तर आनंद होताच, मात्र त्याला बरे करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेले कोरोना संसर्ग वार्डात काम करणारे डॉक्टर, पारिचारिका, कर्मचारी यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता. या सर्वानी टाळ्या वाजवून कोरोनाबाधीत रूग्ण बरे झाल्याचा आनंद व्यक्त केला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून रुग्णांना घरी सोडण्यात आले.