Buldhana News – कर्जमाफीसाठी भर उन्हात निघाला ट्रॅक्टर मोर्चा, हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसह अन्य न्याय मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने शुक्रवारी (2 मे 2025) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो ट्रॅक्टरसह हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते.

बुलढाणा शहरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शतेकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टरला शिवसेनेचे बॅनर लावून मोर्चामध्ये सामील झाले होते. मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सामील झाल्यामुळे बुलढाणा शहरातील वाहतूक जाम झाली होती. शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर शेतातून शहराकडे ‘फडणवीस, शिंदे अन् दादा क्या हुवा तुम्हारा वादा’ यासह कर्जमाफीच्या फलकांनी लक्ष वेधले हाते. भर उन्हात निघालेल्या या मोर्चाने शहर परिसर दणाणून गेला होता.

निवडणूक पूर्व काळात दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडला असल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोषाची लाट आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे. यासह अन्य मागण्यांसाठी काढलेला हा मोर्चा जिजामाता प्रेक्षागार मैदान परिसरातून सुरू होवून संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना सादर केले. मोर्चापूर्वी जिजामाता प्रेक्षागार मैदानावर पार पडलेल्या सभेत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकार्‍यांची आक्रमक भाषणे झाली. यावेळी सर्वच पदाधिकार्‍यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.