मेहकरात मिंध्यांच्या गटाला खिंडार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त 65 जणांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे मिंधे गटाला खिंडार पडले असून 65 जणांनी शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.

मेहकर मतदार संघातील डोणगाव सर्कल हे कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिले असले तरी शिंदे गट वेगळा झाल्यानंतर काही काळ तिथे त्यांचे प्राबल्य होते. मात्र आता परिस्थिती बदलू लागली असून विधानसभा निवडणुकीत डोणगाव सर्कलने स्पष्टपणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आमदार सिद्धार्थ खरात यांना भरघोस मतांनी विजयी केले.

त्या धर्तीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठीही आमदार सिद्धार्थ खरात हे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत असून त्यांच्या कार्यशैलीची आणि नेतृत्वाची दखल घेत अनेक कार्यकर्ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करत आहेत. तर मिंधे गटाला गळती लागत आहे.

याचाच एक मोठा दाखला म्हणून, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त डोणगाव येथे शिंदे गटातील जावेद खान (ठेकेदार) यांच्यासह प्रमुख 65 कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे शिंदे सेनेला मोठे खिंडार पडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

या प्रवेश कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, मेहकर शहर प्रमुख किशोर गारोळे, अँड. संदीप गवई, अर्जुनराव बाजड, दीपक गायकवाड, मदन बाजड, सूरज बाजड, प्रकाश मानवतकर, संतोष मेटांगळे, जावेदभाई खान, सोहेल खान, हमीदभाई आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये जावेद शाह, शफीक शेख, सलमान कुरेशी, सोहिल शाह, सिद्धार्थ खोडके, नसीर शाह, परमेश्वर कुरवाळले, राजू कुरेशी, सलमान कुरेशी, सद्दाम कुरेशी, शकील कुरेशी, सलीम कुरेशी, सिद्धार्थ हिवाळे आणि अन्य शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.

यावेळी बोलताना आमदार सिद्धार्थ खरात यांनी अत्यंत ठामपणे सांगितले की, “अब डरो मत! दहशतवादाला घाबरण्याची गरज नाही. मी आमदार म्हणून तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी तुमच्यासोबत आहेत.

परिवर्तनाचे वारे आता वाहू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठे बदल घडणार आहेत. विरोधक कितीही मोठे असले तरी जनतेच्या मनातील विश्वास संपला आहे. येणारा काळ हा निश्चितच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी सुवर्ण काळ असेल,” तर अजुनही मोठ्या प्रमाणावर प्रवेश होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.