
राजेश देशमाने । बुलढाणा
चिखली येथील खामगाव चौफली येथे २२ डिसेंबरला एक लाख रुपयांच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांच्या नोटा देतो असे सांगून एकाला खेळण्यातील नोटा देणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली आहे. निलयकुमार रमेशराव देशमुख असे फसवणुक झालेल्या तरुणाचे नाव आहे. निलयकुमारने याबद्दल पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या टोळक्याला मोठ्या शिताफीने जेरबंद केले.
या सव्र नोटा २ ०० आणि ५०० रुपयांच्या आहे. या कारवाईमध्ये टोळीमधील आरोपी संतोष जगदेवराव सूर्यवंशी (३८, रा. वाकी, ता. हदगाव, जि. नांदेड, ह.मु. साईनगर, कळमनुरी, ता. हिंगोली, जि. हिंगोली) राजेश शेषराव बोरकर (२१, रा. वार्ड नं. २, सिरसम, ता. हिंगोली) विनोद केरबाजी कुरुडे (४१, रा. बोरी, ता. पुसद, जि. यवतमाळ, ह.मु. वार्ड नं. २, सिरसम, ता. हिंगोली) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचेविरुद्ध फिर्यादी निलयकुमार रमेशराव देशमुख यांच्या लेखी तक्रारीवरुन चिखली पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थागुशाचे पो.नि. महेंद्र देशमुख, पोउपनि मुकूंद देशमुख, एएसआय प्रकाश राठोड, पोहेकाँ अताउल्ला खान, विकास खानझोडे, भारत जंगले, संभाजी असोलकर, संजय म्हस्के, विजय मुंढे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहे.
































































