रेड्याने अडवली ‘मरे’ची वाट, तासाभरानंतर रेल्वे सेवा पूर्ववत

शिवाजी महाराज टर्मिनसवरून कल्याणकडे जाणारी रेल्वे आज सकाळी मुंब्रा येथे रेड्याने अडवली. रेल्वे ट्रॅकवर जलद लोकलने रेड्याला धडक दिल्याने जवळपास एक तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान, रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे पोलीस, हमाल व अन्य नागरिकांच्या मदतीने अडकलेल्या रेड्याला बाजूला करण्यात आले. त्यानंतर लोकल सुरू झाली. या धडकेत रेड्याचा मृत्यू झाला असून तासाभरानंतर रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली.

ठाण्याहूनच कल्याणकडे जाणाऱ्या रेल्वे लाईनच्या जलद मार्गावर मुंब्रा रेतीबंदर येथील राणा बंगल्यासमोर काल  सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघात घडला. या अपघातात फास्ट लोकलने रेड्याला धडक दिल्याने रेडा लोकलच्या चाकात अडकला. रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. काही काळ कल्याणकडे जाणारा जलद रेल्वे मार्ग बंद ठेवण्यात आला होता.

कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा
विचित्र घटनेमुळे अप आणि डाऊन जलद तसेच धीम्या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. एका तासाच्या प्रयत्नानंतर मृत रेड्याला बाहेर काढल्यात आले आणि नंतर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला होता