
बुल्लीबाई प्रकरणात मुंबई सायबर पोलिसांनी अटक केलेल्या विशाल झा, श्वेता सिंग आणि मयांक रावतने ओळख लपवण्यासाठी प्रोटॉन मेलचा वापर केल्याचे समोर आले आहे. तसेच त्या तिघांनी बनावट नावाने ट्विटरवर प्रत्येकी 8-10 अकाउंट उघडले होते. त्या तिघांकडून जप्त केलेल्या मोबाईलमधून काही डेटाचे विश्लेषण करणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बुल्लीबाई अप्स प्रकरणात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बंगळुरू येथून विशाल झा तर उत्तराखंड येथून श्वेता सिंग आणि मयांक रावतला अटक केली. त्या तिघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज त्या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने पोलीस बंदोबस्तात श्वेता आणि मयांकला वांद्रे येथील न्यायालयात हजर केले होते. श्वेता आणि मयांकच्या वाढीव कोठडीसाठी सायबर पोलिसांनी कोर्टात विनंती केली. पोलिसांनी आजवर केलेल्या तपासाबाबतची माहिती न्यायालयात दिली. त्या तिघांनी ट्विटरवर काही पह्टो अपलोड केले होते. पोलिसांनी पकडू नये म्हणून विशाल, मयांक आणि श्वेताने प्रोटॉन मेलचा वापर केला होता. प्रोटॉन मेलमुळे नेमका आयपी अॅड्रेस शोधता येत नाही. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्या तिघांनी प्रोटॉन मेलचा वापर केला. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी त्या तिघांकडून जप्त केलेल्या चार मोबाईल आणि लॅपटॉपची तपासणी केली. जप्त केलेल्या त्या मोबाईलमध्ये प्रचंड डेटा असून त्यात काही पासवर्ड असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. ते पासवर्ड कोणत्या मेलचे आहेत याचा तपास सायबर पोलीस करणार आहेत. त्या दोघांना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विशालला कोविडची लागण
बुल्लीबाई केसमध्ये बंगळुरू येथून अटक केलेला विशाल हा सध्या पोलीस कोठडीत आहे. आज पहाटे कोविडची लक्षणे जाणवू लागल्याने त्याला उपचारासाठी कलिना येथील एका रुग्णालायात दाखल केले आहे. त्याला कोविड झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.































































