वरळी डेपोत इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग सुविधा; बॅकबे, मालवणी, शिवाजीनगरनंतर ठरला बेस्टचा चौथा डेपो  

बॅकबे, मालवणी आणि शिवाजीनगर डेपोनंतर आता वरळी डेपो येथेही इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग सुविधेचे काम पूर्ण झाले आहे. टाटा मोटर्सने वरळीत ही परिपूर्ण वाहन चार्जिंग पायाभूत सुविधा उभारली असून त्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रमाला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील इलेक्ट्रिक बसेसचे जाळे अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. चार्जिंग सुविधा असलेल्या वरळी डेपोचे उद्घाटन नुकतेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.

मुंबईला तापमानवाढीशी जुळवून घेत अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार मुंबईला अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेस्टमध्ये पुढील सहा वर्षांत 100 टक्के इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार असून त्यांच्या चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. आतापर्यंत बॅकबे, मालवणी आणि शिवाजीनगर डेपोमध्ये चार्जिंग सुविधा उभारण्यात आल्या असून वरळी डेपो येथेही इलेक्ट्रिक बससाठी आवश्यक असणाऱया चार्जिंग सुविधेचे काम पूर्ण झाले आहे.