कौतुकास्पद! 8 तास नोकरी, 5 तास अभ्यास; बस कंडक्टरने पास केली UPSC ची मुख्य परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगात अनेक व्यक्ती कठोर मेहनत घेऊन आणि परिस्थितीवर मात करून एक नवा आदर्श निर्माण करतात. अशाच एका तरुणाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे. बंगळुरू येथील बीएमटीसीच्या बसमध्ये कंडक्टर असलेला मधु एनसी या 29 वर्षीय तरुणाने आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर युपीएससीची मुख्य परीक्षा पास केली आहे आणि अनेकांपुढे एक आदर्श ठेवला आहे.

मधु एनसी हा तरुण बंगळुरू येथील बीएमटीसीच्या बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करतो. सरकारी अधिकारी होण्याच्या इच्छेने पछाडलेला मधु बस कंडक्टरची नोकरी सांभाळून आपल्या स्वप्नपूर्तीसाठी रोज पाच तास अभ्यास करतो. आठ तास नोकरी आणि पाच तास अभ्यास करून त्याने युपीएससीची मुख्य परीक्षा पास केली आहे. आयपीएस होण्यासाठी आता त्याच्याकडे संधी असून युपीएससी परीक्षेसाठी 25 मार्च रोजी मधुची मुलाखत चाचणी घेण्यात येणार आहे.

जानेवारी महिन्यामध्ये युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यादीत आपले नाव पाहून मधुचा आनंद गगनात मावेनासा झाला. कुटुंबातील मोठा मुलगा असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. घरातून उच्च शिक्षण घेतलेला तो एकटाच आहे. त्यामुळे काम करून मिळेल त्या वेळेत युपीएससीचा अभ्यास मधुने सुरू ठेवला.

लहानशा खेड्यातील रहिवासी

कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील मालवली या लहानशा खेड्यात राहणाऱ्या मधुने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात युपीएससीची पूर्व परीक्षा पास केली. त्यानंतर त्याने मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली. राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय विषय, मुल्य, भाषा, सामान्य ज्ञान, गणित आणि निबंध लेखन विषयांचा अभ्यास करत आहे. त्याने पूर्व परीक्षा कन्नडमधून तर मुख्य परीक्षा इंग्रजीतून दिली.

आई-बाबांना माहितीच नाहीय, पण…

युपीएससी परीक्षा पास केल्यानंतर मधुने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माझ्या आई-बाबांनी मी नक्की कोणती परीक्षा पास झालोय हे देखील माहिती नाही. परंतु मी कोणतीतरी परीक्षा पास झालोय याचा त्यांना आनंद आहे, असे मधु म्हणाला.