
कोरोनाचा फैलाव रोखता यावा यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मेलबर्नमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला प्रसिद्ध हॉटेलमधील बटर चिकन खाण्याची जबरदस्त इच्छा होती. लॉकडाऊनमुळे त्याला ती इच्छा पूर्ण करता येत नव्हती. त्याने अखेर लॉकडाऊनचे नियम मोडत गाडी काढली आणि 32 किलोमीटर दूर असलेले त्याचे आवडते हॉटेल गाठायचं ठरवलं. हॉटेल काही मीटर अंतरावर असताना पोलिसांनी त्याला अडवला.
नोएल अटकिन्सन असं या व्यक्तीचं नाव असून तो एक बांधकाम कर्मचारी आहे. नोएलची आई ही पंजाबमधील अंबालाची आहे. लहानपणापासून त्याला हिंदुस्थानी खाद्यपदार्थांची प्रचंड आवड आहे. बटर चिकन हा त्याचा सर्वात आवडीचा खाद्यपदार्थ आहे. शुक्रवारी रात्री त्याला बटर चिकन खाण्याची जबरदस्त इच्छा होती. त्याच्या भागातील सर्व हॉटेल 11 वाजता बंद झाली होती. अखेर त्याला एक हॉचेल सापडले मात्र ते 32 किलोमीटर दूर होते. हे हॉटेल होम डिलीव्हरी द्यायला तयार नव्हते. म्हणून नोएलने स्वत:हॉटेलमध्ये जायचं ठरवलं.
हॉटेल अवघ्या काही मीटर अंतरावर असताना पोलिसांनी त्याला अडवलं आणि ‘बाहेर का फिरतोय’ असा प्रश्न विचारला. बटर चिकन आणायला बाहेर निघाल्याचं सांगितल्याने पोलिसांनी नोएलला लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. त्याला 1652 ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच 86,000 हजार रुपयांचा पोलिसांनी दंड ठोठावला. पोलिसांनी नोएलला ताबडतोब घरी जायला सांगितलं. तो घराच्या दिशेने जातोय की नाही हे पाहण्यासाठी काही काळ पोलिसांनी त्याचा पाठलागही केला. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यामध्ये कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याने तिथे पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अत्यावश्य गोष्टींसाठी तिथे घराबाहेर पडण्याची मुभा आहे, मात्र घराच्या आसपासच्या भागातच ते जाऊ शकतात. आसपासचा भाग याची व्याख्या निश्चित नसल्याने नोएलने पोलिसांनी ठोठावलेल्या दंडाला आव्हान द्यायचं ठरवलं आहे. ज्या हॉटेलमधअये नोएल जात होता ते हॉटेल अमित तनेजा यांच्या मालकीचं आहे. देसी ढाबा असं या हॉचेलचं नाव आहे. आपल्याकडील बटर चिकनसाठी नोएलने एकती मोठी जोखीम उचलल्याचं पाहून तनेजा हे आश्चर्यचकीत झाले आहेत. त्यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर नोएल जेव्हा केव्हा त्यांच्या हॉटेलमध्ये येईल तेव्हापासून पुढचे वर्षभर त्याला मोफत बटर चिकन द्यायचं निश्चित केलं आहे.





























































