पासष्टीनंतरही आरोग्य विमा खरेदी करा… वयोमर्यादा हटवली!

आतापर्यंत आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी व्यक्तीची कमाल वयोमर्यादा 65 इतकी ठरवण्यात आली होती. मात्र आता पासष्टीनंतरही आरोग्या विमा खरेदी करता येणार आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) नियमांमध्ये थोडी शिथिलता आणली आहे. त्यामुळे कोणत्याही वयाच्या व्यक्ती आरोग्य विमा खरेदी करू शकतात.

कोरोनाच्या काळापासून आरोग्य विम्याची मागणी वाढली आहे. मात्र वय जास्त असेल तर आरोग्य विमा खरेदी करता येत नव्हता. यापुढे आरोग्य विमा खरेदी करताना वयाची कोणतीही मर्यादा नसेल. हे बदल 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. यामुळे लोकांना खूप फायदा होताना दिसत आहे. तसेच अधिकाधिक लोकांना विमा घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. विमाधारकांच्या सोयीसाठी आयआरडीएआयने विमा पंपन्यांना सर्व वयोगटांना लक्षात घेऊन आरोग्य विमा उत्पादने उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. विमा पंपन्यांना नुकसानभरपाई आधारित आरोग्य पॉलिसी सुरू करणे थांबवून नफ्यावर आधारित पॉलिसी ऑफर करण्यास सांगितले आहे.

ज्येष्ठ नागरिकांचा विचार

आयआरडीएआयने आरोग्य विमा पंपन्यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम पॉलिसी उपलब्ध करून देण्याचे आणि त्यांचे दावे व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पूर्णपणे समर्पित चॅनेल निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत. नव्या नियमांमुळे आता विमा पंपन्यांना कर्करोग, हृदय किंवा मूत्रपिंड निकामी होणे आणि एड्ससारख्या गंभीर वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्तींना पॉलिसी जारी करण्यास नकार देता येणार नाही.

आयआरडीएआयने आरोग्य विम्यासाठी प्रतीक्षा कालावधी 48 महिन्यांवरून 36 महिन्यांवर आणण्याचा निर्णयही घेतला.