
सामना प्रतिनिधी । परळी
परळीमध्ये १९ दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलक आपल्या मागण्यांवर अजूनही ठाम आहेत. आंदोलकांचा विश्वास वाढावा यासाठी राज्यभरातुन मराठा समाजाचा पाठींबा मिळत आहे. विविध संघटनांनी या ठिय्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. शनिवारी बीड जिल्ह्यातील नाळवंडी जिल्हा परिषद सर्कलमधील ५०० दुचाकीवरून भव्य रॅली परळीत दाखल झाली होती.
रविवारी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील १०० सायकलस्वार ३० किलोमीटरचा प्रवास करत परळीत दाखल झाले आहेत. सायकलला भगवे झेंडे लावून ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत परळी शहरातील मुख्य रस्त्याने प्रवास करत तहसील समोरील ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनीही या सायकल रॅलीत सहभाग नोंदविला. बीड जिल्ह्यात मराठा समाजाकडून अनेक प्रकारे आंदोलन करून फडणवीस सरकारचा निषेध केला जात आहे.




























































