
आशिष बनसोडे, मुंबई
कळत-नकळत ज्या हातून गुन्हा घडलाय त्याच हाती पेन आणि ब्रश पकडून कैदी कॅनव्हासवर आपली कलापुसर रेखाटत आहेत. भायखळा जिल्हा कारागृहात ‘जस्ट आर्ट’ या उपक्रमांतर्गत कैद्यांना विविध कला शिकण्याची व त्यांच्या सुप्त गुणांना सादर करण्याची संधी मिळत आहे. कैदी एकापेक्षा एक जबरदस्त चित्र व कला रेखाटून त्यांच्या अंतरंगातला कलावंत कॅनव्हॉसद्वारे जगासमोर आणू पाहत आहेत.
कारागृहात गेल्यानंतर आयुष्य अगदी बोथड होऊन जाते. काही करता येत नाही, छंद जोपासायचा विचार तर मनाला शिवतदेखील नाही. कुटुंब, मित्रपरिवारापासून दुरावल्याने त्याचा आपसूकच कैद्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. हे चित्र बदलण्यासाठी भायखळा जिल्हा कारागृहात कैद्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यात सकारात्मकता, बंधुभाव, प्रेम, आपुलकी वाढविण्यावर विशेष भर दिला जातोय. यासाठी कैद्यांच्या अंतरंगात दडलेल्या कलावंताला जागं करून त्यांचा कलाविष्कार सर्वांपुढे आणण्यासाठी ‘जस्ट आर्ट’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे कारागृह अधीक्षक विकास रजनलवार यांनी सांगितले.
कैद्यांची पसंती
नोव्हेंबर 2024 पासून ‘जस्ट आर्ट’ हा उपक्रम कारागृहात सुरू करण्यात आला असून आतापर्यंत 20 पुरुष आणि 40 हून अधिक महिला अशा प्रकारे 70 ते 80 कैद्यांनी याचा फायदा करून आपल्या कलाविष्काराचे मुक्त रंग कॅनव्हासवर रेखाटले आहेत. कैदी त्यांच्या मनाप्रमाणे वेगवेगळी चित्रे काढून दाखवत आहेतच, पण त्याशिवाय त्यांना प्रोफेशनल चित्रकारांकरवी विविध आर्टदेखील शिकविल्या जात आहेत.
कुठल्या कैद्यांना चित्र काढायला येते. तसेच कोणाला चित्र काढावेसे वाटते अशा कैद्यांना आम्ही पुढे आणतो. मग त्यांना प्रोफेशनल चित्रकारांकरवी टेक्चर आर्ट, पिअर्स ड्रिव्ह, युकिओ आर्ट, लाईन पेन्सिल, लाईफ ड्रॉइंग, ब्लॉक प्रिंटिग, फिगर ड्रॉइंग असे आर्ट शिकवले जात आहेत. जेणेकरून त्यांच्यातला कलावंताला वाव मिळेल आणि बाहेर गेल्यानंतर ते त्यांच्या कलेच्या माध्यमातून चांगले आयुष्य जगू शकतील. याकरिता आमचे हे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच एक चित्रकला स्पर्धा घेऊन काही निवडक चित्रांचे प्रदर्शन भरविण्याचा आमचा विचार असल्याचे अधीक्षक विकास रजनलवार यांनी सांगितले.
कारागृहाच्या चार भिंतीच्या आत आल्यानंतर कैद्यांमध्ये नकारात्मकता न वाढता त्यांच्यात चांगले विचार, आचार रुजावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही कारागृहात ‘जस्ट आर्ट’ हा उपक्रम सुरू केला आहे. विशेष म्हणजे कैद्यांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. – योगेश देसाई, उपमहानिरीक्षक (कारागृह विभाग)





























































