
भायखळा येथील पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात लवकरच अॅनाकोंडा येणार आहे. यासाठी उद्यान प्रशासनाकडून ‘सर्पालय’ बनवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सर्पालयामध्ये देशी-विदेशी 16 प्रकारचे साप मुंबईकर, पर्यटकांना पाहता येणार असल्याची माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाचा पालिकेच्या माध्यमातून कायापालट करण्यात येत आहे. यामध्ये 2017मध्ये हंबोल्ट पेंग्विन आणल्यानंतर या ठिकाणी दररोज येणाऱया पर्यटकांची संख्या चार ते पाच हजारांवरून थेट 25 ते 30 हजारांपर्यंत वाढली आहे. शिवाय वार्षिक उत्पन्नही दहा कोटींवर गेले आहे. या पार्श्वभूमवर पालिकेच्या माध्यमातून उद्यानाचा कायापालट करण्यात येत आहे.
असे होणार सर्पालय
नवीन सर्पालय 16,800 चौरस फूट जागेवर तयार करण्यात येणार आहे. तेथे सापाच्या गरजेनुसार आवश्यक तापमान असेल. यातील काही सापांना अतिशय शीत वातावरण लागते, तर काही सापांना दमट वातावरणाची आवश्यकता असते.
काही प्रजातींना उष्ण, तर काही प्रजातींना समशीतोष्ण वातावरण लागते. त्या पद्धतीने हे सर्पालय तयार करण्यात येणार आहे.
हे साप पाहता येणार
घोणस, मण्यार, सरपटोळी, फुरसे असे साप पाहता येतील. देशी सापांसोबतच ट्रिंकेत संके, जॉन बॉ, रेड सॅड बॉ, व्हितकेर बॉ, रसेल वायपर, का@मन इंडियन व्रेट, रॉक पायथोन, चेकड किलबॅक, इंडियन कोब्रा बँडेड व्रेट, मॉनिटर लिझार्ड, विदेशी प्रजातींसह अजगर, धामण हे साप पाहता येतील.

























































