एकतर्फी प्रेमातून धमकावणाऱ्या तरुणाला शिक्षेतून माफी

41

सामना ऑनलाईन । मुंबई

एकतर्फी प्रेमातून तरुणीला लग्नासाठी धमकावणाऱ्या तरुणाच्या शिक्षेतून माफी दिल्याची घटना मुंबईत घडली आहे. भावेश वाघेला (२४) असं या तरुणाचं नाव असून तो सीए (सनदी लेखापाल)चा विद्यार्थी आहे. तीन वर्षांची शिक्षा कमी करून एका वर्षाच्या करारावर आरोपीची सुटका करण्यात आल्याचा हा प्रकार काहीसा दुर्मीळ आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, एकतर्फी प्रेमातून भावेश पीडित तरुणीच्या मागे लागला होता. त्यासाठी त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, त्याचं चांगलं वर्तन आणि भविष्याचा विचार करून पीडितेच्या वडिलांनी त्याची शिक्षा कमी करण्याबाबत विनंती केली. त्यामुळे एका वर्षाच्या शिक्षेनंतर पुन्हा असं कृत्य होणार नाही, अशा करारावर त्याला मुक्त करण्यात येणार आहे.

भावेश आणि पीडित तरुणी यांची ओळख २०१३-१४मध्ये अंधेरी येथील सीएच्या क्लासमध्ये झाली. त्यावेळी अभ्यासाच्या बाबतीत त्यांचं बोलणं होत असे. डिसेंबर २०१४मध्ये क्लासचा कालावधी संपला. मात्र, त्यानंतरही भावेश तरुणीला कॉल करून वारंवार तिला लग्नाची मागणी घालत होता. तरुणीने नाही असं सांगूनही त्याने कॉल करणं थांबवलं नाही. तरुणी ऐकत नसल्याचं पाहून भावेशने तिला धमकवायला सुरुवात केली. तुला परीक्षेला बसू देणार नाही आणि दुसऱ्या कुणाशी लग्नही करू देणार नाही, असं म्हणत भावेश तिला त्रास देत राहिला.

एप्रिल २०१५मध्ये तरुणीने आपल्या पालकांना विश्वासात घेऊन भावेश त्रास देत असल्याचं सांगितलं. कुटुंबीयांनीही भावेशला त्रास न देण्याबद्दल सांगितलं. पण, त्यानंतरही तो तिला धमकावत राहिला. एक दिवस तिच्या घरी येऊन तिच्या वडिलांसमोर त्याने तिला मागणी घातली. तिने नकार देताच पुन्हा त्याने तिला बघून घेईन असं म्हणत धमकावलं. यानंतर मात्र, तरुणीच्या वडिलांनी भावेशविरुद्ध पोलिसात धाव घेतली. मिळालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भावेशला अटक केली. या प्रकरणात भावेशची एक तथाकथित मैत्रीणही सामील असल्याचं समोर आलं होतं. मात्र, पुराव्याअभावी तिची मुक्तता करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या