सीएएचा मुस्लिमांना त्रास झाला तर रस्त्यावर उतरेन! ‘सुपरस्टार’ रजनीकांत यांची विरोधकांना ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीएएवरून देशभरात गदारोळ माजलेला असतानाच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी ‘सीएए’ला पाठिंबा देणारे वक्तव्य केले आहे. ‘नागरिकत्व कायदा हा देशातील मुस्लिमांच्या विरोधात नाही. या कायद्यामुळे एकाही मुस्लिमाला फटका बसल्यास त्यासाठी मी सर्वात आधी रस्त्यावर उतरून आंदोलन करेन,’ अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यांच्या या भूमिकेवर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली. रजनीकांत हे भाजपचे पोपट आहेत, असे ते म्हणाले.

सीएए कायद्यामुळे मुस्लिम नागरिकांना कुठलाही फटका बसणार नाही. हिंदुस्थानी मुस्लिम हे आपले बांधवच आहेत. त्यांना कुणीही दूर लोटू शकत नाही. ज्यांना पाकिस्तानात जायचं होतं ते फाळणीच्या वेळीच तिकडे गेले आहेत. मात्र, हिंदुस्थानला मातृभूमी मानणारे मुस्लिम कुठेही गेले नाहीत. सीएए कायद्याच्या मुद्यावरून त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोक करीत आहेत. काही राजकीय पक्ष सीएएवरून लोकांची दिशाभूल करत आहेत. विद्यार्थ्यांनी राजकीय पक्षांच्या या प्रचाराला बळी पडू नये. कुठल्याही आंदोलनात उडी घेण्याआधी त्यांनी हा विषय पूर्णपणे समजून घ्यायला हवा,’ असेही प्रतिपादन रजनीकांत यांनी केले.

– दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने सीएए हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवला आहे. असे असतानाच रजनीकांत यांनी ’सीएए’वर भाष्य केलं आहे. दक्षिणेत प्रचंड लोकप्रिय असलेले व अलीकडेच स्वतःचा पक्ष स्थापन करून राजकारणाच्या मैदानात उतरलेले रजनीकांत यांचं हे वक्तव्य सूचक मानले जात आहे.