दिल्लीत आरएसएसच्या कार्यक्रमात राडा; दोन गटात धरपकड, धक्काबुक्की अन् मारहाण

1104

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे (आरएसएस) राजधानी दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राडा झाला. मौलवींसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात दोन मुसलमान गट एकमेकांशी भिडले. हे प्रकरण धरपकड, धक्काबुक्की अन् मारहाणीपर्यंत पोहोचले. हा सर्व प्रकार आरएसएसचे नेते इंग्रेश कुमार यांच्या समोरच घडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आरएसएसद्वारे देशभरातील मौलवींसाठी दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात देशभरातील मुसलमान नेते आणि मौलवी सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान काही लोकांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर दोन गट आमनेसामने आल्याने प्रकरणा हाणामारीवर आले.

‘एएनआय’ने ट्विटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कार्यक्रम सुरु असताना काही लोक कागद भिरकावत समोर येतात आणि घोषणाबाजी करतात असे दिसते. घोषणाबाजीमुळे वातावरण बिघडते आणि उपस्थित लोक विरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांना धक्के मारत बाहेर काढतात. यानंतर दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की अन् मारहाण होते.

दरम्यान, या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कार्यक्रमात घोषणाबाजी करणाऱ्यांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या