
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँगेस व इतर विरोधी पक्षांवर निशाणा साधला. काँग्रेसने पाकिस्तानविरोधात नव्हे तर छळाला त्रासलेल्या शरणार्थींविरोधात आंदोलन सुरू ठेवलेय, असा आरोप त्यांनी कर्नाटकातील जाहीर सभेत केला.
आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा बुरखा फाडण्याची गरज आहे. हे सोडून काँग्रेस व इतर विरोधी पक्ष हिंदुस्थानच्या संसदेविरोधात आंदोलन करताहेत. पाकिस्तानातून आलेल्या पीडित शरणार्थींविरोधात आंदोलन करताहेत. तुम्हाला जर आंदोलनच करायचे असेल तर पाकिस्तानच्या 70 वर्षांतील कारनाम्यांविरोधात करा, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला. पाकिस्तानातून आलेले हिंदू व त्यातील बहुतेक दलितांना आम्ही त्यांच्या नशिबाच्या हकाली सोडू शकत नाही, असे ते म्हणाले.
तुम्ही बिर्याणी आणि आंब्याचा खेळ बंद करा! काँग्रेसचा मोदींवर पलटवार
पाकिस्तानला उत्तर द्यायचे असेल तर तुम्ही बिर्याणी आणि आंब्याचा खेळ बंद करा अशा शब्दांत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेले आंदोलन संसदेविरोधात नाही, तर तुमच्या फुटीरतावादी धोरणाविरोधात आहे. आम्ही देशाचे तुकडे-तुकडे होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका काँग्रेसने मांडली.
काँग्रेस पाकिस्तानविरोधात नाही तर तेथून हिंदुस्थानात आलेले शरणार्थी आणि संसदेविरोधात आंदोलन करतेय, असा आरोप पंतप्रधान मोदींनी कर्नाटकात केला. त्यावर काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून उत्तर दिले. पाकिस्तानला हिंदुस्थानने 1948, 1965, 1971 आणि कारगील युद्धात ज्या जखमा दिल्या आहेत त्यातून ते अजून सावरलेले नाहीत, असे नमूद करतानाच काँग्रेसने पंतप्रधान मोदींना बिर्याणी आणि आंब्यावरून सणसणीत टोला लगावला.

























































