
टिकटॉक व्हिडिओ बनविण्यासाठी आणि फोटोग्राफी करण्यासाठी लग्नसमारंभातून फोटोग्राफरचा महागडा कॅमेरा चोरणाऱ्याला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले. प्रतीक गव्हाणे (वय 19) असे जेरबंद केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश पवार यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश व्यवसायिक फोटोग्राफर असून 14 फेब्रुवारीला ते मगरपट्टयातील लक्ष्मी लॉन्समध्ये एका लग्नसमारंभात फोटोग्राफी करीत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन प्रतीकने त्यांची महागड्या कॅमेऱ्याची बॅग चोरून नेली. त्यानंतर पोलिसांनी लॉन्समधील सर्व सीसीटीव्हीचे फुटेज तपासणी करुन प्रतीकला ताब्यात घेतले. चौकशीत प्रतीकने स्वतःला फोटोग्राफीचा आणि टिकटॉक व्हिडिओ बनविण्याचा छंद असल्याचे सांगितले. मात्र, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्याने फोटोग्राफरचा कॅमेरा चोरी करण्याचा डाव रचला. त्यानंतर मगरपट्टयातील लक्ष्मी लॉन्समध्ये जाऊन महेशच्या महागड्या कॅमेऱ्याची पिशवी चोरून पळ काढल्याची कबुली दिली.
ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, रमेश साबळे, अनिल कुसाळकर, विजय पवार, ज्ञानेश्वर चित्ते, प्रशांत नरसाळे यांच्या पथकाने केली.
चोरीआधी लॉन्समध्ये मेजवाणीवर मारला ताव
लॉन्समधून फोटोग्राफरचा कॅमेरा चोरण्यासाठी प्रतीकने चांगली कपडे परिधान केले. त्यानंतर लग्नसमारंभातील मेजवाणीवर त्याने ताव मारला. परिसरात फिरून फोटोग्राफरने कॅमेऱ्याची पिशवी कोठे ठेवली आहे, याचा माहिती घेतली. त्यानंतर लग्नातील गर्दीचा फायदा घेऊन आणि फोटोग्राफर जागेवर नसताना प्रतीकने कॅमेऱ्याची पिशवी चोरून पळ काढला. मात्र, लॉन्समधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात प्रतीक कैद झाल्याने त्याला पोलिसांनी जेरबंद केले.




























































