
जेईई परीक्षेचा सॅम्पल रिझल्ट जारी केला जात नाही, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.
संकेतस्थळावर सॅम्पल रिझल्ट जारी झाला तेव्हा सुमारे 99 टक्के गुण होते. काही वेळाने रिझल्ट बघितला तेव्हा 83 टक्के गुण नमूद होते. एनटीएने अचूक रिझल्ट द्यावा, अशी मागणी करत एका विद्यार्थ्याने न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्या. अतुल चांदुरकर व न्या. मिलिंद साठय़े यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात एनटीएने हे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने या विद्यार्थ्याची मागणी फेटाळून लावली.
या विद्यार्थ्याने सॅम्पल रिझल्ट म्हणून निकालाची बनावट प्रत सादर केली आहे. यासाठी त्याला दोन वर्षे परीक्षा देता न येण्याची शिक्षा देण्यात आली आहे, असे एनटीएचे वकील रुई राड्रीक्स यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.