अकोल्याजवळ कंटेनर व कारचा भीषण अपघात, 4 जण जागीच ठार

977

विदर्भातील अकोला खामगांव राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या कंटेनर व कारच्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार झाले आहेत. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात कारमधील 4 जण जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील पिंप्राळा फाट्यानजीक आज सायंकाळी घडली.

अकोला येथील रहिवासी असलेले चार जण मारोती कारने (क्रमांक एमएच 27, आर 3632) खामगावकडून अकोलाकडे जात होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील पिंप्राळा फाट्यानजीक अकोलाकडून खामगावकडे येणाऱ्या कंटेनरने (क्रमांक आरजे 18, जीबी 2559) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारला जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात मारोती कारचा चुराडा होवून कारमधील निलेश उर्फ पप्पू मनोहर जोशी, राहुल सातळे, अतुल व्यवहारे,  विनोद शंकर बावणे (सर्व रा.बाळापूर रोड, शिवनगर, अकोला) या चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी मृतकांचे शव सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असून पुढील कारवाई सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या