
आपल्या सुंदर चेहऱ्याबरोबरच ओठांचे सौंदर्यही तितकेच महत्त्वाचे असते. ओठांची त्वचा ही अत्यंत नाजूक असते. त्याची योग्य काळजी न घेतल्यास ओठ काळवंडणे, फाटणे यांसारख्या समस्या निर्माण होतात आणि चेहऱयाच्या सौंदर्यात बाधा ठरतात. अशा वेळी त्यांची वेळोवेळी काळजी घेणे गरजेचे असते.
आठवड्यातून एकदा स्क्रब करावे
चेहऱयाप्रमाणे ओठांचेही स्क्रबिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. ओठांवर असलेली मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रब हा उत्तम उपाय मानला जातो. लिप क्रबचा वापर केल्यास ओठांवर असलेली मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळते. त्यासाठी आठवडय़ातून एकदा लिप स्क्रब करणे महत्त्वाचे आहे. त्याने ओठांचे सौंदर्य कायम टिकून राहील. ओठांवर सतत लिपस्टिक लावणे, लिप बाम लावणे याने ओठ काळवंडूही शकतात. अशा वेळी लिप स्क्रबचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हणजे हे लिप स्क्रब घरच्या घरीही करू शकता. त्यासाठी मध आणि लिंबाने ओठांना काही वेळ मसाज करा. तसेच ऑलिव्ह ऑइल किंवा मध आणि साखर मिक्स करून त्याने ओठांवर हलक्या हाताने स्क्रब करा. त्यानंतर टिश्यू किंवा एका स्वच्छ कपड्याने ओठ पुसून घ्या आणि त्यावर लिप बाम लावा. फरक दिसून येईल.
ओठांचा मेकअप काढणे
अनेकांना बाहेरून आल्यावर लिपस्टिक न काढताच झोपण्याची सवय असते, पण ही सवय ओठांच्या सौंदर्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. त्यासाठी रात्री झोपताना न विसरता ओठांचा मेकअप काढून झोपणे महत्त्वाचे आहे. ओठांवर लिपस्टिक तशीच ठेवून झोपल्यास ओठ काळे पडू शकतात.
भरपूर पाणी प्यावे
ओठांना नेहमी हायड्रेट ठेवण्यासाठी विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. यासोबतच नारळ पाणी, लिंबाचा रस यांचा समावेश करू शकता. त्याने ओठांना पोषण मिळेल.
शक्य असल्यास ओठांना मसाज करावा
ओठ मुलायम आणि कोमल ठेवण्यासाठी चेहऱयाप्रमाणे ओठांचाही मसाज केला जातो. त्यासाठी ओठांना बदामाचे तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा अन्य कुठल्याही तेलाने मसाज करा. तेलाने ओठांना मसाज केल्याने ओठ कोमल होण्यास मदत मिळते. अनेकांना ओठ चावायची सवय असते. अशा वेळी ओठांना चिरा पडणे, काळे डाग पडणे, ओठ कोरडे पडणे या समस्या जाणवू लागतात. मात्र नियमित ओठांना मसाज केल्यामुळे हे सगळे त्रास कमी होऊ शकतात. ओठ हे फार हायड्रेट होतात.
ओठांसाठी वापरा सनस्क्रीन
त्वचेप्रमाणेच ओठांनाही सनक्रीनची गरज असते. आजकाल बाजारात सनक्रीनयुक्त लिप बाम आणि लिपस्टिक सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे एसपीएफ 20 व त्यापेक्षा अधिकची लिपस्टिक किंवा लिप बाम निवडा.
लिपस्टिक, लिप बाम कायम बॅगेत ठेवा
ओठांचे सौंदर्य वाढविण्यासाठी लिपस्टिक लावणे गैर नाही, पण त्यासाठी चांगल्या दर्जाची लिपस्टिक वापरणे गरजेचे आहे. ओठ अत्यंत नाजूक भाग असल्याने लिपस्टिकची निवड करताना चांगल्या दर्जाची करणे गरजेचे आहे. त्यामुळे ओठांचे सौंदर्य खुलविण्यासाठी चांगल्या दर्जाच्या प्रॉडक्ट्सचा वापर करणे तितकेच आवश्यक आहे.
या चुकांमुळे ओठ होतात काळे –
हलक्या दर्जाची लिपस्टिक टाळा
ओठांचे सौंदर्य वाढवण्यात वेगवेगळ्या लिपस्टिकचा वापर केला जातो, पण काही जणी काही पैसे वाचविण्यासाठी हलक्या दर्जाच्या लिपस्टिक वापरण्यास प्राधान्य देतात. कुठलीही लिपस्टिक वापरल्यास ओठ काळे पडण्याची शक्यता असते.
कालबाह्य झालेली लिपस्टिक वापरू नये
अनेक महिलांना महिनोन्महिने एकच लिपस्टिक वापरण्याची सवय असते. कालबाह्य लिपस्टिक ओठांना वापरल्याने ओठांचे नुकसान होऊ शकते.
लिप बाम
ओठांची होणारी जळजळ, कोरडेपणा आणि फाटलेले ओठ चांगले करण्याचं काम हा लिप बाम करतं. प्रदूषण, धूळ, घाण आणि सूर्याची हानीकारक किरणे, ज्यामुळे ओठ कोरडे व निस्तेज वाटू लागतात. मेकअप बॅगमध्ये लिप बाम असणे महत्त्वाचे आहे.
ओठांचे सौंदर्य खुलविण्यासाठी
– चांगल्या लिपस्टिकबरोबरच ओठांचे सौंदर्य खुलविण्यासाठी लिप लाइनरही महत्त्वाचे आहे. लिप लाइनर लावल्याने लिपस्टिक पसरत नाही आणि ते ओठांना योग्य प्रकारे लिपलाइन देतात. त्याने ओठ आतर्षक वाटण्यास मदत होते.
– ओठांचे सौंदर्य खुलविण्यासाठी लिपस्टिक महत्त्वाची आहे. यामध्ये ग्लॉसी, मेटॅलिक, सॅटिन, लिक्विड आदी लिपस्टिक उपलब्ध आहेत आणि त्या सर्व आपल्याला एक वेगळा लूक देतात.
– ओठ चमकदार करण्यासाठी लिप ग्लॉसचा वापर केला जातो. लिपस्टिकवर थोडे लिपग्लॉस लावल्यास ओठांना एक वेगळी चमक येते आणि ओठांचे सौंदर्य खुलण्यास मदत होते.
ओठांच्या सौंदर्यासाठी पोषण आहार
– किमान 8-10 ग्लास पाणी नियमित प्या. पाण्यामुळे ओठांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
– ओठांना नैसर्गिकरीत्या मुलायम ठेवण्यासाठी काकडी फायदेशीर ठरते. आहारात पालक, लेटय़ूस, ब्रोकोली यांसारख्या व्हिटॅनिम ‘सी’युक्त भाज्यांचा आहारात समावेश करावा.
– व्हिटॅमिन ‘बी’ मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी डाळी, कडधान्य आहारात असणे आवश्यक आहेत.
– अळशी ओठांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते. त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असल्याने ते त्वचेमधील नैसर्गिक मॉईश्चरायझर टिकवून ठेवण्यास मदत करते.



























































